फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत; नऊ दिवस सकाळ-संध्याकाळ आरती व पूजनाचा उत्साह
मोर्शी /तालुका प्रतिनिधी
निंभार्णी येथे नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गादेवीचे थाटात आगमन करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीने देवीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी गावात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नऊही दिवस सकाळी व सायंकाळी देवीची आरती, पूजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने पार पडणार आहेत. आरतीच्या वेळी महिला मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देवीची आरती करणार असल्याने उत्सवाला विशेष रंगत येणार आहे.तसेच अष्टमीच्या दिवशी माता आईच्या मंदिरात अवधूती भजन मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी भक्तिमय वातावरणात भजन सादर करण्यात येणार असून, त्यानंतर महाआरती करण्यात येईल. महाआरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.नवरात्रोत्सवाच्या काळात गावातील नागरिकांसह महिला व चिमुकल्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. विशेषतः दसऱ्याच्या दिवशी चिमुकल्यांसाठी डान्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, या कार्यक्रमाची लहान मुलांसह पालकांनाही उत्सुकता लागली आहे.नवरात्रोत्सवाचे हे नऊ दिवस धार्मिक उत्साह, भक्तिभाव आणि विविध कार्यक्रमांनी आनंदात पार पडणार आहेत. या उत्सवात गावातील नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
