संदेश ढोके यांच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; रिक्त जागेवर प्रेरणा पेठे यांची नियुक्ती
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या शिक्षक पदावर अखेर नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायत सदस्य संदेश ढोके यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाकडे आक्रमकपणे मांडलेल्या मागणीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रिक्त जागेवर सहाय्यक शिक्षिका म्हणून प्रेरणा जयंत पेठे यांची नियुक्ती करण्यात आली.
पिंपळगाव निपाणी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यातच शिक्षकाचे पद रिक्त झाल्याने शाळेवरील शैक्षणिक भार आणखी वाढला होता.

ही बाब गांभीर्याने घेत ग्रामपंचायत सदस्य संदेश ढोके यांनी दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देत रिक्त जागेवर तातडीने शिक्षक नियुक्त करण्याची मागणी केली होती. मात्र निवेदनानंतरही सुमारे २० दिवस कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ढोके यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत पाठपुरावा अधिक तीव्र केला.प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी संदेश ढोके यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषद CEO कार्यालयावर घेराव घातला.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याने रिक्त पदावर तातडीने शिक्षक नियुक्त करण्यात यावा,अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.“विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर प्रशासनाची उदासीनता खपवून घेतली जाणार नाही,” अशी भूमिका घेत संदेश ढोके यांनी वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व कर्यकर्त्यांना सोबत घेऊन शिक्षक नियुक्तीचा प्रश्न प्रशासनासमोर ठामपणे मांडला. निवेदन, पाठपुरावा आणि आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी हा प्रश्न सातत्याने लावून धरला.वंचित बहुजन आघाडीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने अखेर दखल घेऊन रिक्त जागेवर सहाय्यक शिक्षिका म्हणून प्रेरणा जयंत पेठे यांची नियुक्ती केली.शिक्षक नियुक्ती झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून पालक आणि ग्रामस्थांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.या नियुक्तीमुळे संदेश ढोके यांच्या प्रयत्नांना यश आले असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित प्रश्न केवळ निवेदनापुरते मर्यादित न ठेवता त्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रत्यक्ष निर्णय होईपर्यंत संघर्ष करण्याची भूमिका संदेश ढोके यांनी घेतली.“गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न हा केवळ शाळेचा विषय नसून संपूर्ण गावाच्या भवितव्याचा प्रश्न आहे.रिक्त शिक्षक पदामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आणि आवश्यक तेव्हा आंदोलनाची भूमिकाही घेतली.अखेर शिक्षक नियुक्त झाल्याने विद्यार्थ्यांना न्याय मिळाला,” अशी भूमिका संदेश ढोके यांनी व्यक्त केली.दरम्यान, शिक्षक नियुक्तीचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हितासाठी महत्त्वाचा टप्पा असून,शाळेतील उर्वरित शैक्षणिक अडचणींकडेही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे,अशी अपेक्षा संदेश ढोके यांनी केली.
