जुन्या काळापासूनची परंपरा
पथ्रोट / प्रतिनिधी
महामारी, रोगराई, दुष्काळी संकट, नैसर्गिक आपत्ती, पिकांवरील कीड, भ्रष्टाचार, समाजघातक अनिष्ट प्रथांच्या नाशासाठी पांढव्याच्या ब्रह्ममुहूर्ताला हाती काठी अथवा पळसाची डहाळी व ताट वाजवत घेऊन ‘संकट, रोगराई घेऊन जाय वो मारबत…’ असे म्हणत मारबत काढण्याची प्रथा अजूनही कायम आहे. भल्या पहाटे शुक्रवारी रोजी पथ्रोट गावात ही मारबत निघणार आहे.

वऱ्हाडातील लोकसंस्कृतीचा भाग असलेली मारबत पथ्रोटसह परिसरातील गावात काढल्या जाते. या प्राचीन प्रथेस कितीतरी कालावधी झाला असल्याचे वृद्ध सांगतात. मारबत उत्सवाचा संबंध थेट महाभारत काळाशी जुळलेला आहे. मायावी पुतना राक्षसी बाळकृष्णाला मारण्यासाठी सुंदर स्त्रीचा वेश धारण करून मावशीच्या रूपात गोकुळात आली. मात्र कृष्णाने पुतना मावशीचा वध केल्याने गावकऱ्यांनी गावाबाहेर काढून जाळले. तेव्हापासून पोळा सणाच्या पाडव्याच्या भल्या पहाटे मारबत घराबाहेर हाकलण्याची प्रथा आहे.

पोळ्याच्या दिवशी काळी चिकण माती आणून मातीचे गायवासरू, बैलजोडीसह एक बाहुली, पणती, चारा टाकण्याची गव्हाण बनवितात. देवघरात पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूजन केले जाते. बैलपोळ्याच्या पाडव्याला अर्थात करीच्या दिवशी भल्या पहाटे झोपेतून लहानांपासून जागे करून ‘इडा पिडा, सर्दी, खासी खोकला, किडा किटुक घेऊन जा गे मारबत’ असे म्हणत घरातून मारबत मरीमायच्या मंदिरात घेऊन जातात. तेथे पूजन करून नैवेद्य दाखवल्यावर गावाच्या वेशीवर विसर्जित केल्यावर कर साजरी केली जाते.
मूळचा झाडीपट्टीतील पश्चिम विदर्भात स्थायिक झालेला तेली समाज विशेषकरून एरंडेल तेली समाज गोकुळाष्टमीला कृष्णदेवाची स्थापना, पोळ्याच्या पाडव्याला मारबत हाकलणे, रथसप्तमीनंतर कुळदेवतेची पूजा देवमई करणे या झाडीतील सर्व प्रथा पाळतात.
-नितीन दुर्बुडे
