अनेक महिन्यांपासून शिक्षकाचे पद रिक्त; प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात वंचित आक्रमक
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाचे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असून, शिक्षक नियुक्तीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी, ८ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना घेराव घालत आक्रमक भूमिका घेतली.
रिक्त जागेवर शिक्षक नियुक्ती बाबत आपण १९/०८/२०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते.मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही.शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असून, प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करू नये, अशी भूमिका आंदोलकांनी यावेळी मांडली. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत,अशी मागणी करीत वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी सीईओंसमोर आपली मागणी ठामपणे रेटून धरली.विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून,त्यासाठी आवश्यक असलेली शिक्षक व्यवस्था उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र,मागणी करूनही शिक्षक नियुक्तीबाबत अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

यावेळी आंदोलकांनी “विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी तडजोड चालणार नाही”, “रिक्त शिक्षक पदे तातडीने भरा”, “जिल्हा परिषद शाळा वाचवा”अशा मागण्या प्रशासनासमोर ठामपणे मांडल्या.मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हा परिषद परिसरात शाळा भरविण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन शिक्षक नियुक्तीबाबत ठोस निर्णय घ्यावा,अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते,शहर उपाध्यक्ष शैलेश बागडे,जिल्हा कोषाध्यक्ष संदेश ढोके,सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अजय तायडे, तिवसा तालुका युवा आघाडीचे तालुका महासचिव अमोल जवंजाळ,प्रशांत गजभिये,नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष रोशन गाडेकर, धीरज घोडेस्वार, सिद्धार्थ गजभिये,शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष प्रमोद वरघट, धीरज मिसाळ आदी उपस्थित होते.
