“बम बम भोले” च्या गजरात शहर दुमदुमले
भक्तिरसात न्हाऊन निघाले नागरिक
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारच्या पवित्र पर्वानिमित्त नांदगाव खंडेश्वर शहरात यंदाही पारंपरिक भव्य दिव्य अशी कावड यात्रा काढण्यात आली. या यात्रेने शहरातील वातावरण उत्साह, भक्ती आणि आध्यात्मिक उर्जेने भारावून गेले होते . ‘बम बम भोले’, ‘हर हर महादेव’च्या गजरात शहरातील प्रत्येक प्रत्येक चौक यावेळी भक्तिरसाने दुमदुमून गेला होता .

नेत्रदीपक कावडधारीनी जिंकली मने
तालुक्यातील विविध गावांमधून आलेल्या शेकडो कावडींनी यात्रेला हजेरी लावून शोभा आणली. आकर्षक सजावट,रंगीबेरंगी पालख्या,भगव्या पताका,ढोल-ताशे,डीजे, टाळ-मृदग यांच्या गजरात आलेल्या कावडींनी नागरिकांची मने जिंकली.महिलांसाठी वेगळ्या कावडी तर पुरुषांसाठी वेगळ्या कावडी असा भक्तांचा सहभाग यात्रेत लक्षणीय ठरला.

मध्यप्रदेशातून आलेले भस्म पथक व साधूंचे पथक ठरले आकर्षण
यंदाच्या यात्रेत मध्यप्रदेशातून आलेले भस्म पथक आणि साधूंचे पथक हे विशेष आकर्षण ठरले. साधूंची व भस्म धारण केलेल्या पथकाची वेशभूषा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

संगमातून जल आणून भगवान खंडेश्वरांना अर्पण
ही कावड यात्रा संत गजानन महाराज मंदिरातून सुरुवात होऊन शहरातील मुख्य मार्गांनी मार्गक्रमण करत भगवान खंडेश्वर मंदिरात दाखल झाली. यात्रेसाठी बेंबळा व साखळी नदीच्या संगमातून आठ किलोमीटर अंतरावरून पवित्र जल आणले गेले. या पवित्र जलाने भगवान खंडेश्वरांचा भव्य अभिषेक करून यात्रेचा समारोप झाला.
पुष्पवर्षावाने स्वागत – भक्तीमय वातावरण
यात्रेदरम्यान शहरातील ठिकठिकाणी आरती,पूजा व पुष्पवर्षाव करून कावडींचे स्वागत करण्यात आले. नागरिकांनी घराबाहेर येऊन कावडीकरांना प्रसाद व पाणी दिले.भक्तगणांनी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभाग घेतला.

भर पावसातही संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती
कावड यात्रेला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विविध गावांमधील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पावसाने सुद्धा हजेरी लावल्याने भर पावसातही भोलेच्या भक्तामध्ये भक्तिभाव,आनंद आणि सामाजिक एकात्मतेचे दर्शन या यात्रेत दिसून आले.

समारोप महाआरती व महाप्रसादाने कावडची सांगता
कावड यात्रेचा समारोप भगवान खंडेश्वर मंदिरात पारंपरिक महाआरतीने झाला. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. त्यामुळे यात्रेचा शेवटही भक्तिरसाच्या वातावरणातच झाला.

भक्तिरसाने भारावले शहर
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कावड यात्रेने नांदगाव खंडेश्वर शहराला एक वेगळाच आध्यात्मिक रंग दिला. ही यात्रा नागरिकांसाठी श्रद्धा, भक्ती व आनंदाचा उत्सव ठरली.यावेळी भर पावसातही पोलिसाचा बंदोबस्त चोख होता.
