‘नागद्वारला जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण!’ लहानपणी मोठ्यांकडून ऐकलेले हे शब्द आजही आठवतात. मध्यप्रदेशातील सातपुड्याच्या घनदाट जंगलात, उंचच उंच पर्वतरांगांच्या कुशीत आणि खोल दर्यांच्या सान्निध्यात वसलेल्या नागद्वारची यात्रा म्हणजे धाडसी माणसांचेच काम, अशीच त्यावेळी धारणा होती. यात्रेला जाणार्यांना निरोप देण्यासाठी अख्खे गाव मारुतीच्या पारावर जमायचे.
निरोपाच्या वेळी डोळ्यांत पाणी आणि मनात काळजी असायची. ‘हा सुखरूप परत आला तर आपला!’ अशीच कुटुंबीयांची भावना असायची.पण यंदा या खडतर यात्रेचा अनुभव स्वतः घेण्याची संधी मिळाली आणि जाणवले.नागद्वारची वाट नक्कीच कठीण आहे; मात्र या वाटेवर श्रद्धा असेल तर प्रत्येक पाऊल आनंद देत जाते.नागद्वार हे केवळ तीर्थक्षेत्र नाही,तर श्रद्धा, साहस, निसर्ग आणि माणुसकी यांचा अनोखा संगम आहे. आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात जिथे अनोळखी माणसाला मदत करण्यापूर्वी अनेकदा विचार केला जातो, तिथे नागद्वारच्या वाटेवर मात्र अनोळखी यात्रेकरूही आपला वाटतो. कोणी चढताना अडखळले तर हात पुढे होतो, उतरताना पाय घसरला तर आधार मिळतो. येथे स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, गाव-शहर असा कोणताही भेद उरत नाही. सगळेच एकमेकांचे ‘भगत-भगतीन’ बनून या खडतर वाटेवर सोबत चालत राहतात.

दोन वर्षांपूर्वी माझी मावशी नागद्वारला जाऊन आली होती. यंदाही तिचा जाण्याचा बेत ठरला आणि तिचा फोन आला. त्या फोनने माझ्याही मनात नागद्वारला जाण्याची उर्मी निर्माण झाली.१५ ऑगस्टला मारुती मंदिरात दर्शन घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली.आम्ही सात जण नागपूरहून ट्रॅव्हल्सने निघालो.मटकुली येथे ट्रॅव्हल्स थांबली. तेथून सौसर पार करताच घाटाचा प्रवास सुरू झाला. वळणावळणाचे रस्ते, डोंगरांच्या कुशीतून जाणारा प्रवास आणि खिडकीबाहेर दिसणारा हिरवाईने नटलेला निसर्ग मनाला वेगळाच आनंद देत होता. पंचमढी जवळ येताच सातपुड्याचे सौंदर्य अधिक खुलत गेले.समुद्रसपाटीपासून सुमारे ११०० मीटर उंचीवर असलेले पंचमढी म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळलेले सौंदर्य! हिरव्यागार पर्वतरांगा, चांदीसारखे चमकणारे झरे, उंच कड्यांवरून फवार्यासारखे कोसळणारे धबधबे आणि क्षणाक्षणाला बदलणारे पावसाळी वातावरण… पाऊस कधी सुरू झाला आणि कधी थांबला, हेही कळत नव्हते.पण पंचमढी मागे पडली आणि नागद्वारची खरी परीक्षा सुरू झाली. येथे फुलझाडे नाहीत, बागा नाहीत, घरे नाहीत. ओबडधोबड पायवाटा, दगडधोंडे आणि त्यांच्या शेजारी खोल दर्या! काही ठिकाणी तर वाट अवघी दीड-दोन फूट रुंद. एका चुकीच्या पावलाने खाली किती खोल जाऊ, याची कल्पनाही करवत नाही. तरीही श्रद्धेच्या बळावर हजारो यात्रेकरू याच वाटेने पुढे जात असतात. १६ ऑगस्टला सकाळी अकराच्या सुमारास आम्ही पंचमढीतून नागद्वारच्या दिशेने निघालो. सुमारे सहा किलोमीटरवर असलेल्या धूपगडाच्या प्रथमद्वाराशी पोहोचलो. सातपुड्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या धूपगडाची उंची सुमारे ४४३० फूट आहे. तेथे दर्शन घेतल्यानंतर पायदळ यात्रेला सुरुवात झाली.

काजळी,श्रावणबाळ मंदिर, गणेशद्वार, नागद्वार, पद्मशेषगुफा, पश्चिमद्वार, अग्निद्वार, स्वर्णद्वार, निमपहाडी,आमकी पहाडी, चिंतामणी, गंगावन शेष, चित्रशाला माता, दत्तगिरी, दादाजी धुनीवाले बाबा, नंदीगड, नागिणी, पद्मिनी, राजगिरी, गुलालशेष, चंदनशेष, हळदीशेष… अशी अनेक ठिकाणे पार करत सुमारे २० किलोमीटरची पायपीट करायची होती.मध्ये-मध्ये पावसाच्या सरी कोसळत होत्या. सोबत आणलेले सामान भिजले. वाटेत ‘भजेगिरी’ येथे गरमागरम मक्याचे भज्यांचा आस्वाद घेतला आणि पुन्हा पायवाट धरली.काजळीr येथे पोहोचल्यानंतर श्रावणबाळ मंदिराचे दर्शन घेतल्यावर श्रावण बाळाच्या छोट्याशा आश्रमात मुक्काम केला. दुसर्या दिवशी सहा वाजताच पुन्हा मार्गस्थ झालो. जंगलातील पायवाट सुरू झाली. एक डोंगर चढायचा, दुसरा उतरायचा आणि पुन्हा तिसरा चढायचा… सपाट रस्ता नावालाही नव्हता.मात्र या खडतर वाटेवर सतत जाणवत होती..माणुसकी!वाटेत ठिकठिकाणी अन्नदानाचे भंडारे होते.थकलेल्या यात्रेकरूंना मोफत भोजन देणार्या या भंडार्यांमुळे शरीराला ऊर्जा आणि मनाला समाधान मिळत होते. अनेक सामाजिक संस्था स्वखर्चाने ही सेवा करत होत्या. जंगलाच्या मध्यभागी सुरू असलेली ही अन्नसेवा पाहताना जाणवले की, श्रद्धा केवळ देवळात नसते; ती माणसाच्या सेवेतही असते.नागपंचमीच्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास अखेर नागद्वारचे दर्शन झाले. दोन उंच पहाडांच्या मधोमध असलेल्या अरुंद कपारीत पद्मशेष बाबांची छोटीशी मूर्ती आहे. तेथे गाणी, आरती आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने वातावरण भारून गेले होते. एका बाजूला तुळशी वृंदावन आणि दुसर्या बाजूला आकाशाला भिडणारे उंच पर्वतत्या क्षणी निसर्ग आणि अध्यात्म जणू एकरूप झाले होते.पद्मशेषद्वार येथे अन्नदानाचा अनेक ठिकाणी भंडारा घेऊन आम्ही पश्चिमद्वारच्या दिशेने निघालो.काही ठिकाणी आधारासाठी लोखंडी साखळ्यांची व्यवस्था होती. दगडधोंड्यांतून वाट काढताना एका बाजूला डोंगर आणि दुसर्या बाजूला खोल दरी..प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागत होते.पश्चिमद्वारची गुहा अवघी तीन-चार फूट उंच असल्याने आत वाकून जावे लागले. नागद्वार स्वामींचे दर्शन घेतले आणि पुन्हा काजळीच्या दिशेने निघालो.मनात निशाणगड चढण्याची उत्सुकता निर्माण झाली. अनेक यात्रेकरू सांगत होते, ‘निशाणगड चढणे खूप अवघड आहे.’ चढण सरळ Dााणि काही ठिकाणी धोकादायक कड्यांवरून जाणारी होती. तरीही मी आणि माझा भाऊ ‘हर हर महादेव’चा जयघोष करत गड चढायला सुरुवात केली. प्रत्येक पावलागणिक दम लागत होता, पण उत्साह कमी होत नव्हता. अखेर गडमाथ्यावर पोहोचलो आणि समोरचा निसर्ग पाहून सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला. बाण, त्रिशूळ, महादेवाची पिंड आणि अगदी जवळून सरकणारे ढग जणू आकाशच हाताच्या अंतरावर आले होते!गड उतरून संध्याकाळी सहाच्या सुमारास खाली आलो. रात्री दहाच्या सुमारास जीपने जंगलातील वाटेने पंचमढीकडे निघालो. रस्त्यावर राई, आवळा, आंब्याचे झाडें आणि आमच्या जीपसीला नीलगाई आडव्या झाले व जंगल पार करत रात्री अकराच्या सुमारास पंचमढीत पोहोचलो.दुसर्या दिवशी सकाळी सात वाजता चौरागडच्या दिशेने निघालो. समुद्रसपाटीपासून सुमारे ४३१५ फूट उंचीवर असलेल्या चौरागडावर जाण्यासाठी सुमारे बाराशे पायर्या चढाव्या लागतात. प्रत्येक पायरीसोबत देव आठवत होता. शरीर थकले होते; पण मनात दर्शनाची ओढ होती. एकदाचे चौरागडाचे शिखर दृष्टीपथात आले. शिवमंदिर दिसले आणि थकलेल्या चेहर्यावर आपोआप हास्य फुलले.वाटेत काकडी आणि मक्याच्या भाकरीची दुकाने होती. बेलफुले घेऊन चौरागडाच्या माथ्यावर पोहोचलो. सभोवताली त्रिशूळांच्या रांगा आणि मध्यभागी शंकराचे मंदिर.अनेक भाविक नवस फेडण्यासाठी खांद्यावर त्रिशूळ घेऊन येथे येतात. चौरेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पंचमढीत परतलो. त्यानंतर जटाशंकर आणि गुप्त महादेवाचे दर्शन घेतले.तीन दिवसांच्या सततच्या पायपिटीने शरीर अक्षरशः थकून गेले होते. त्यामुळे पंचमढीतील अनेक सुंदर स्थळे पाहता आली नाहीत. पांडव गुंफा, रॉक पेंटिंग, बी फॉल, अप्सरा विहार आणि सुमारे ३५० फूट उंचीचा रजतप्रताप धबधबा पाहण्याचे राहून गेले. पंचमढीत सुमारे ४८ प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यापैकी अनेक ठिकाणे अजूनही माझ्या पाहण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या प्रवासाचा शेवट करताना मनात एकच विचार आहे—‘पंचमढी, पुन्हा नक्की यायचे!’
नागद्वारची यात्रा पूर्ण करून परतीच्या वाटेवर असताना जाणवले की, हा केवळ डोंगर-दर्या पार करण्याचा प्रवास नव्हता. ही होती श्रद्धेची परीक्षा, शरीराच्या क्षमतेची कसोटी, निसर्गाची अनुभूती आणि माणुसकीचा प्रत्यक्ष साक्षात्कार.पाय दुखत होते, शरीर थकले होते; पण मन मात्र आनंदाने भरून गेले होते. वाटेत अनोळखी माणसांनी दिलेली मदत, अन्नदानाच्या भंडार्यातून मिळालेला प्रसाद, ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमणार्या पर्वतरांगा आणि निसर्गाच्या कुशीत अनुभवलेली ती शांतता..हे सगळे आयुष्यभर स्मरणात राहणार आहे.ही यात्रा संपली, पायवाट मागे पडली; पण नागद्वारने मनावर उमटवलेल्या आठवणी मात्र कायमच्या सोबत राहिल्या.
मयुरी बारी,अमरावती,मो.७०६६२२७२८७
