रेल रोको कृती समितीचे डीआरएम यांना निवेदन
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
चांदूर रेल्वे स्टेशनची अवस्था फार वाईट झालेली आहे. याकडे वरिष्ठ रेल्वे अधिकारी वर्गांचे दुर्लक्ष होत असुन प्रवाशांचे हाल होत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे त्वरीत निराकरण करावे अशी मागणी स्थानिक रेल रोको कृती समितीने स्टेशन प्रबंधक यांच्यामार्फत डीआरएम, नागपुर यांना सोमवारी (ता. 18) पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.चांदूर रेल्वे स्टेशनवर नागपुर – पुणे या रेल्वे गाडीचा थांबा देण्यात यावा अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे. तर चांदूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे. मात्र सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. तसेच या बांधकामात जुन्याच विटांचा वापर करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी होऊन चांगल्या दर्जाचे काम करण्यात यावे, रेल्वे स्टेशनवरील एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी असलेल्या ओव्हर रूट फूट ब्रिजची स्थिती अत्यंत धोकादायक आहे. या पुलावरील जुना काँक्रीटचा थर काढून २ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या फूटब्रिजवरून चालतांना प्रवाशांचे हाल होत आहे. त्यामुळे सदर ब्रिजचे काम त्वरीत करण्यात यावे, अनेक दिवसांपासून रेल्वे स्टेशनवर अस्वच्छता पसरलेली आहे. प्लॅटफॉर्मवर अनेक ठिकाणी गवतही वाढलेले दिसून येते. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी त्वरीत नेमण्यात यावे, स्वच्छता गृहात पाण्याची व्यवस्था नसुन तेथे सुध्दा घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच तेथे लाईट सुध्दा नसुन यामुळे महिलांची गैरसोय होत आहे, रेल्वे प्लेटफॉर्म वर रेल्वे गाडीच्या कोचच्या माहितीसाठी कोच इंडिकेटर ची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून प्रवाशांची ट्रेन आल्यावर पळापळ होणार नाही, दोन्ही प्लॅटफॉर्मवर पुरेशी लाईट व्यवस्था नसल्याने रात्री अंधार असतो. त्यामुळे आणखी लाईट दोन्ही प्लॅटफॉर्मवर लावण्यात यावे या समस्या निवेदनातून रेल्वे विभागाकडे मांडण्यात आल्या.सदर सर्व समस्या येत्या 15 दिवसांत सोडविण्यात याव्या अन्यथा आंदोलनाची भुमिका घेण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी, सदस्य मेहमुद हुसैन, विनोद जोशी, राजाभाऊ भैसे, बंडूभाऊ यादव, हर्षल वाघ, प्रा. प्रसेन्नजित तेलंग, भुषण नाचवणकर, विनोद लहाणे, महादेव शेंद्रे, भिमराव खलाटे यांसह अनेकांची उपस्थिती होती. निवेदनाच्या प्रति खासदार अमर काळे, आमदार प्रताप अडसड यांना पाठविण्यात येणार आहे.
चांदूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची उंची लहान असुन ट्रेनच्या बोगीच्या पायऱ्या थोड्या उंचीवर जातात. त्यामुळे महिला, वृध्दांना ट्रेनमध्ये चढतेवेळी त्रास होतो. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात यावी.
नितीन गवळी
अध्यक्ष, रेल रोको कृती समिती, चांदूर रेल्वेे
