पार्डीत बुद्ध–फुले–अशोक- आंबेडकर संयुक्त जयंतीचा उत्साह.
अंजनगाव बारी / पवन इंगोले
पार्डी (देवी) येथे महान समाजप्रबोधक विचारांचे चार पुरस्कर्ते—तथागत गौतम बुद्ध, धर्मनायक सम्राट अशोक, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर—यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.दिनांक ३० एप्रिल २०२६ च्या पूर्वसंध्येला सुप्रसिद्ध सप्तखंजिरी वादक, समाज प्रबोधनकार पवन महाराज दवंडे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून बौद्ध धम्म, समता आणि सामाजिक परिवर्तनाचे संदेश गावामध्ये गुंजणार आहेत.या वेळी भंते सारीपुत्त स्थविर यांचे धम्मदेशना तसेच जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून संतोष परांजपे उपस्थित राहणार आहेत. तसेच चंद्रशेखर चतुर्वेदी (धम्म अभ्यासक) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संध्याकाळी ७ वाजता इंजि. प्रफुल्ल महाराज दवंडे यांच्या वादकांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होणार असून मार्गदर्शनही लाभणार आहे.यजमान मंडळाच्या माहितीप्रमाणे, दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुद्धजयंती—दि. १ मे २०२६ रोजी—धम्म ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर बुद्धवंदना, उपस्थितांचे मार्गदर्शन व भोजनदान अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या भव्य जयंती महोत्सवासाठी परिसरातील बंधू-भगिनींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन भीमज्योत मंडळ व प्रज्ञायुती महिला मंडळ, पार्डी (देवी) यांनी केले आहे.
