•रेल्वे दुरुस्ती कामामुळे 24 एप्रिल ते 15 मेपर्यंत मार्ग बंद;
•नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन..
अंजनगाव बारी /पवन इंगोले
मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळांतर्गत वर्धा–बडनेरा रेल्वे मार्गावरील मालखेड़ स्टेशनजवळील LHS क्रमांक 69 येथे रस्त्याची दुरुस्ती (Road Repairing) व पेव्हर ब्लॉक बसविण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे संबंधित मार्ग 24 एप्रिल 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे काम सुरक्षित व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी मार्ग बंद ठेवणे आवश्यक आहे. कामाच्या कालावधीत नागरिक व वाहनांची ये-जा या मार्गाने होणार नसल्यामुळे परिसरातील नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.दरम्यान, ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाला नागरिकांना याबाबत पूर्वसूचना देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक (Notice Board) लावून पर्यायी मार्गांची माहिती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नागरिकांनी कोणतीही अडचण टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.कामादरम्यान अपघात टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे, असेही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
