दर्यापूर तालुक्यातील भामोद येथील घटना @ धोकादायक वीजतार तात्काळ हटविण्याची मागणी
दर्यापूर / तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील भामोद येथे घरावरून गेलेल्या थ्री-फेज वीजतारेमुळे दोन चिमुकल्या मुलींना विजेचा जोरदार शॉक बसून त्या गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना ८ मार्च २०२६ रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित धोकादायक वीजतार तात्काळ हटविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भामोद येथील रहिवासी गोवर्धन बापूराव चव्हाण यांच्या मुली आरुषी गोवर्धन चव्हाण (वय १० वर्षे) व देवांशी गोवर्धन चव्हाण (वय ५ वर्षे) या दोघीही घराजवळ खेळत असताना घराच्या छतावर गेल्या. यावेळी घरावरून एल अँड टी कंपनीची थ्री-फेज वीजतार गेली असल्याने त्या तारेला स्पर्श होताच दोघींनाही विजेचा जोरदार शॉक बसला.

या अपघातात दोन्हीही मुली गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या दोन्ही जखमी मुलींवर उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी वीज वितरण विभागाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. घरांच्या अगदी जवळून किंवा छतावरून वीजतारा नेण्यात आल्यामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.दरम्यान,

या गंभीर घटनेची दखल घेऊन संबंधित धोकादायक वीजतार तात्काळ हटवून सुरक्षित अंतरावरून वीजवाहिनी टाकण्यात यावी, तसेच घटनेची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत अचलपूर येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन सदर धोकादायक वीजतार तातडीने काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

