६२ वर्षाची परंपरा कायम..
नांदगाव खंडेश्वर :- तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तिर्थक्षेत्र सावनेर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षिही ‘श्री संत वामन महाराज संस्थान’चे वतीने श्रीमत् भागवत तसेच व्यसनमुक्ती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाला दि.०४ फेब्रुवारी पासुन शुभारंभ होणार असुन ७ दिवस सप्ताहाभर हरिपाठ, किर्तन, भजन असे विवीध कार्यक्रम राबविले जाणार आहे.बुधवार दि. ०४ फेब्रुवारी पासुन दररोज दुपारी १ ते ४ पर्यंत भागवत कथेचे वाचन भगवत कथा प्रवक्ता योगी निरंजन नाथ गुरु शांती-नाथ महाराज (आळंदी) यांच्या अमृततुल्य वाणीतुन होणार आहे. भागवत कथेबरोबरच व्यसनमुक्तीच्या अनुषंगाने योगी निरंजननाय महाराज जनजागृती करून ‘व्यसनमुक्त होऊन भागवत भक्त होण्यास’ नागरीकांना प्रवृत्त करून, आध्यात्मिक जीवणाचे आनंदमय रहस्य पटवून देणार आहेत. या संगीतमय भागवताला गायक स्वर ह.भ.प. अनंतराव महाराज अरबट , मृदुंगाचार्य ह.भ.प.आदित्य महाराज, आॅरगन वादक सुधाकर महाराज बोबटकर असणार आहे.दररोज सकाळी ८ ते १० आध्यात्मिक जागृती व बोध देणाऱ्या अशा किर्तणाचे आयोजन सप्ताहाभर करण्यात आले आहे. या प्रमुख किर्तनकारमध्ये ह.भ.प. अच्युत महाराज बोरडे, ह.भ.प.रमेश मी महाराज दुधे, चैतन्य महाराज राऊत (बालकीर्तनकार ), ह.भ.प श्रीकृष्ण महाराज (वाघुळ), ह.भ.प. बाल वामन महाराज (सावनेर), ह.भ.प. मधुकर महाजन खोडे, ह.भ.प. पंकज महाराज पोहोकार यांचा समावेश असुन काल्याचे किर्तन किर्तनकार ह.भ.प.हरिभाऊ म्हसाये महाराज यांच्या मधुर वाणीतुन होणार आहे. या सप्ताहातील कार्यक्रमांना प्रमुख उपस्थिती म्हणून हरिद्वार उत्तर प्रदेश येथील गुरूदेव महामंडलेश्वर महाराज, श्री.इश्वरानंद महाराज, श्री.उत्तम स्वामिजी महाराज उपस्थित रहणार आहे.बुधवार दि.११ फेब्रुवारी २०२६ ला भव्य यात्रा व महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप होणार असून, या श्रीमद भागवत व व्यसनमुक्ती सप्ताहाला जास्तीत जास्त संख्येने भाविकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान ‘श्री संत वामन महाराज संस्थानचे’ अध्यक्ष श्री.संत सच्चिदानंद बाल वामन महाराज यांनी केले आहे.
