मोर्शी /संजय गारपवार
विश्वेश्वरी त्वं परिपाशी विश्व।
विश्वात्किक धारयसिती विश्वम् ॥
या पुराणातील श्लोकावरून देवीचा संबंध साऱ्या विश्वाशी जोडला गेला आहे, म्हणून तर देवीला जगाची रक्षणकर्ती संबोधले आहे. भारतातभर सर्वत्र हजारो वर्षापासून शक्ती देवीची उपासना केली जाते.भारतात अनेक ठिकाणी या शक्ती देवीची अनेक शक्तीपीठे आहेत.शारदीय नवरात्रात या मंदिरातुन या शक्ती देवीची उपासना व आराधना केली जाते महाराष्ट्रत साडेतीन शक्तिपीठे आपल्याला ठाऊक आहे .एक कोल्हापूर च्या अंबाबाईचे ,दुसरे तुळजापूरच्या भवानी मातेचे,तिसरे माहुरच्या रेणुकामाताचे, अन अर्ध वणीची सप्तश्रृंगी मायेचे .त्याच प्रमाणे कलकत्याची कालीमाता, मुंबईची – मुंबादेवी, तुळजापूरची – भवानी माता, काश्मीरची – वैण्णवदेवी, माहूरची – रेणुका देवी ,अशी ५१ शक्तीपीठे आहेत . अमरावतीची-अंबादेवी या त्यापैकी काही होत. या शक्तिपीठा मध्ये पिंगळाई देवीचाही क्रम लागतो.मोर्शी ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावर गोराळा बस थांब्यावरून पूर्वेस अंदाजे 2 कि.मी. अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात उंच टेकडीवर पिंगळादेवीचे पुरातन काळापासून ऐतिहासिक असे जागृत स्वयंभू मंदिर आहे. मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू आहे. देवीच्या मूर्तीच्या सभोवतालचा मंदिराचा गाभारा हेमांडपंथी बांधणीचा होता. आता त्या ठिकाणी नवीन सभामंडप तयार करण्यात आली आहे. अशी मंदिरे बहुधा आढळत नाही. ती फार जुनी व प्राचीन असतात. या मंदिरासमोर एक भव्य सभामंडप आहे. तो दगड चुन्याने बांधलेला असून, समोर एक महाव्दार आहे. या सभामंडपाच्या महाव्दाराचे वास्तुशिल्प एखाद्या मशिदीसारखे असून ते निजाम काळात बांधलेले असावे अशी चर्चा आहे.याबाबत असे सांगितल्या जाते की, काही वर्षापूर्वी मंदिरासमोर एक लाकडी सभामंडप होता. तो नेरपिंगळाई येथील निजामाच्या सरदाराने तोडून टाकला आणि तो सरदार एलीचपूर (अचलपूर) येथे कामानिमित्ताने गेला असता एकाएकी त्याच्या पोटात दुखू लागले.अनेक मांत्रिकांनी व वैद्यांनी त्यांच्यावर उपचार केले, परंतु सारे व्यर्थ ठरले. तेव्हा देवी त्याच्या स्वप्नात आली आणि त्याला दृष्टांत दिला. त्याने मोडून टकलेला सभामंडप बाधून देण्याचे देवीला कबूल केले आणि पूजाण्याकरवी तीर्थ व अंगारा, प्रसाद बोलावून तो सेवन करताच त्याचे पोटदुखणे एकदम थांबले. त्याने आधी मोडतोड केलेला सभामंडप पूर्वास्थितीत करून दिला. स्वत:वर गुदरलेला हा प्रसंग सरदाराने हैदराबादच्या निजाम राजाला कथन केला. त्याच्याही मनात या देवीबद्दल आस्था निर्माण झाली. विशेष म्हणजे त्याने या मंदिराच्या रंगरंगोटी करिता वर्षाकाठी आर्थिक मदत देणे सुरू केले. निजाम संस्थान खालसा होईपर्यंत सदर मदत सुरू होती. तेव्हापासून अनेक मुस्लिम बांधव या देवीला आपले श्रध्दास्थान मानतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गडावर इंग्रजाच्या काळातील एक स्तंभ आहे. त्याला (सिगनेटीक सर्व्हस्टॅन्ड)असे म्हणतात. पूर्वी या स्तंभावरून दूरदूरच्या प्रदेशाचा सर्व्हे केल्या जात असे. तसेच पिंगळादेवीच्या मंदिरासमोर असलेला तलाव नागपूरचे राजे भोसले यांनी बांधला आहे. तो कापूर तलाव म्हणून ओळखला जातो. या तलावामधील पाण्याला कापूरासारखा वास येतो. तलावाला बाराही महिने पाणी असते. तलावातील पाण्याने नाना तऱ्हेचे चर्मरोग नाहीसे होतात, असे म्हणतात. म्हणून भक्तगण त्या पाण्याने आंघोळ करतात नेरपिंगळाईला जाण्याकरिता चुना व दगडाने बांधलेल्या जुन्या पायऱ्या आहेत. त्यासुध्दा राजे भोसले यांनीच बांधल्या असाव्यात, असे जाणकार लोक सांगतात. तलावाला लागूनच एकमहान तपस्वी नागेश्वर महाराज नग्न अवस्थेत राहात होते आणि त्यांचे अंगावर साप खेळत, असे प्रत्यक्ष पाहणारे वृध्द लोक सांगतात. नागेश्वराच्या समाधीचे बाजुलाच शिरखेडच्या नानागुरू महाराजांचे पिता वामन महाराज यांची समाधी सुध्दा गडावर आहे.पिंगळादेवी ही जागृत देवता असून तेथे जाणारा प्रत्येक भक्त दर्शनासाठी पुन्हा पुन्हा जाण्याचा प्रयत्न करीत असतो. पिंगळा मातेचे रूप अत्यंत दर्शनीय असून माता आपले रूप दिवसातून तीन वेळा बदलविते. सकाळी बाल्यरूप, दुपारी तरूणावस्था, सायंकाळी वृध्दावस्था येथे काही वर्षापूर्वी नवरात्रात एक चमत्कारीक घटना घडली. गडावर नवसत्र सुरू असतांना वरून पाऊस सुरू झाला. अनेक भक्त मंडळी देवळात भजन, पुजन करीत असतांना अचानक आकाशातून वीज कडाडली आणि ती देवळाच्या कळसावर पडली आणि मंदिरात (देवळात) एकच गोंधळ झाला. देवीच्या कृपेने कुणालाही इजा पोहचली नाही परंतु परकोटाची एक भिंत मात्र कोसळली. देवीच्या अंगावर असलेले पितांबर (वस्त्र) अग्नीमुळे भस्म झाले. आजही ती घटना अनुभवणारे अनेक लोक आहेत. शारदीय नवरात्रात व चैत्र नवरात्र भाविक भक्तगणांना दर्शनासाठी देवीच्या मंदिरामध्ये रांग लावावी लागते. तसे वर्षभर दूरदूरन दर्शनासाठी लोक येतातच. परंतु नवरात्रामध्ये विशेष गर्दी होते हे नवरात्र अश्विन शुध्द प्रतिपदे पासून तर नवमी पर्यंत नऊ दिवस उत्सव सरू असतो. या नऊ दिवसात भक्तगण देवीचा उदोउदो ,जागर करतात. म्हणून नवरात्र गजबजून जाते. देवीचे भक्तगण दूरदूर आहेत ते नवरात्रात दर्शनाकरिता येतात व कृतकृत्य होवून जातात. देवीचे मंदिर प्राचीन असल्यामुळे पाहण्यासारखे भाविक येतात .पिगळा देवी गडावर चैत्र शुध्द पौर्णिमेला सुध्दा यात्रा भरते.पिंगळदेवी संस्थान नेरपिंगळाई,नांदूरा पिंगळाई,सावरखेड पिंगळाई या तीन गावच्या आणि अमरावती मोर्शी तालुक्याच्या सीमेवर असून ते संस्थान पब्लिक ट्रष्ट म्हणून नोंदविल्या गेले आहे. या संस्थानची बहूतेक जमीन कुळ कायद्यात गेलेली आहे. त्यामुळे संस्थेजवळ स्वत:च्या उत्पन्नाचे साधन नाही. पुजारी कै.त्र्यंबकराव नांदूरकर यांनी फारच परिश्रमाने वर्गणी गोळा करून मंदिराचा बऱ्याच अंशी जीर्णोद्धार केलेला आहे.शासनाने अप्पर वर्धा जलाशयातून अमरावती कडे पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मधून पिण्याच्या पाण्यासाठी गडाच्या पायथ्याजळ गडावर नळाव्दारे पाणी उपलब्ध करून दिले.यात्रेकरूंसाठी धर्मशाळाही येथे बांधण्यात आली आहे. विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. या .मंदिरावर जाण्या करिता रोडचे खासदार निधीतून सिमेंट काँक्रिटीकरण झाले आहे. कोणतेही वाहन गडावर सहज जाऊ शकते तसेच गोराळा बस स्टँपपासून पिंगळदेवीवर जाणाऱ्या रोडवर ग्रामपंचायत च्या वतीने लाईट लावलेले आहेत.ही पूर्व श्रध्देप्रमाणे पिंगळदेवीची कृपा आहे.देवीचे पुजारी सुरेशराव नांदूरकर हे आहेत.गडावर अप्परवर्धा धरणाचे अमरावती शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता प्रेशर टँक व जुनीच असलेली दाबखंड टाकी,नेरपिंगळाई पाणी पुरवठा फिल्टर टाकी,पोलीस बिनतारी रिपोटर स्थानक,रेव्हणी डिपार्टमेंट वायरलेस स्टेशन,संस्कृतिक भवन सैदर्यात अधिकच भर पडली आहे. पिंगळा देवी संस्थांच्या मंदिरात जुना गाभारा कायम ठेवून भव्य सभा मंडप तयार करून त्यावर राजस्थान येथून कुशल कारागीर बनवून तीन कळस स्थापन केले आहेत. जिर्णोद्धार जवळपास पूर्ण झाला असून सध्या मंदिराचे विश्वस्त आहेत अध्यक्ष विनित पकोडे,सचिव आशीष मारुडकर हे भक्तांच्या मदतीने मंदिराच्या जीर्णोद्धार करून घेत आहेत. देणगी देणाऱ्यांची नावे बोर्डवर नोंदविण्याची योजना या विश्वस्त मंडळाने केली आहे. या देवस्थानाला येणाऱ्या देणगीवरच येथील कारभार केल्या जातो.या मंदिराची संपूर्ण व्यवस्था श्रीपिंगळदेवी संस्थान (र.नं.ए.२४९७) च्या मार्फतच केल्या जाते. अशा या प्रसिध्द धार्मिक,ऐतिहासिक तीर्थक्षेत्रास शासनाने पर्यटन स्थान म्हणून घोषीत केल्यामुळे पिंगळा देवी गड नावलौकिक होत आहे.अमरावती वरून पिंगळादेवी 40 किलोमीटर, मोर्शी वरून 17 किलोमीटर, जवळचे रेल्वे स्टेशन रिद्धपूर आहे.
