‘अरे खोप्यामधील खोपा सुगरणीचा चांगला, पिलासाठी तिने झोका झाडाला टांगला…’
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
पावसाळा सुरू झाला की सुगरण पक्षी म्हणजेच विणकर आपली घरटी बांधण्यात दंग असतात. काटेरी बाभळीच्या वा उंच झाडांच्या फांद्यांवर झुलणारी ही घरटी दुरून पाहतानाच मोहून टाकतात. पिलांचे ऊन, पाऊस, शतू पक्षी किंवा सापांपासून संरक्षण व्हावे म्हणून सुगरण आपल्या घरट्यांची रचना खास कौशल्याने करते. काही घरटी लांबोळकी तर काही लहान असतात.वाऱ्यावर झुलताना जणू आकाशात पाळणा टांगला आहे, असा भास होतो. अनेकदा सुगरणींची संपूर्ण वसाहत झाडभर दिसून येते. वादळ-पावसातही फांदीला घट्ट बांधलेली ही घरटी सुरक्षित राहतात. घरटे बांधण्याची ही कला पाहून सुगरण हा पक्षी जणू पक्षिजगताचा अभियंता वाटतो.

बहुधा विहिरी, ओढे, नाले यांच्या काठावर असलेल्या चिंच, लिंब, करंज, वड, काटेरी वेडी भाबळ, खैर यांसारख्या झाडांवर ही घरटी बांधली जातात. नर पक्षी घरटे बांधतो व ते मादीला दाखवतो. मादीला आवडले नाही तर तो दुसरे घरटे बांधतो.नर पक्ष्याचे गडद पिवळे शरीर व काळे डोके हे विशेष लक्षण असते, तर मादी फिकट पिवळसर रंगाची असते. मादी साधारण चार ते पाच अंडी घालते. सुगरणीची पिल्ले पूर्ण ताकद येईपर्यंत उडत नाहीत. मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या काँक्रीटच्या जंगलामुळे व झपाट्याने होणाऱ्या वृक्षतोडीमुळे सुगरणींच्या घरट्यांची संख्या कमी होत चालली आहे. तरीही ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी आजही सुगरणींची घरटी झाडांवर डुलताना दिसतात.
