
गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार यांचे आवाहन
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) आणि राज्य पुरस्कृत आवास योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 4470 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, पुढील वर्ष 2025-26 साठी 971 घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय राज्य पुरस्कृत आवास योजनेसाठी 2023-24 मध्ये 628 तर 2024-25 मध्ये 200 घरकुलांचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
या योजनांचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून कच्च्या घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या बेघर लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. निवडीनंतर पात्र लाभार्थ्यांची यादी व प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवले जातात. त्यानंतर पंचायत समिती स्तरावरून आवश्यक पडताळणी करून प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे (DRDA) सादर केला जातो. जिल्हास्तरावरून मंजुरी ऑनलाइन स्वरूपात दिल्यानंतर प्रथम हप्ता पंचायत समितीकडून वितरित केला जातो.
गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असून कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या देवाणघेवाणीची आवश्यकता नाही.कोणताही कर्मचारी लाभार्थ्याकडून आर्थिक मागणी करत असेल तर अशा प्रकरणांची लेखी तक्रार पंचायत समिती कार्यालयात त्वरित करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासन कटिबद्ध असून गरजूंना त्यांच्या हक्काचे निवासस्थान मिळावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे नांदगांव खंडेश्वर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.स्नेहल शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.