
प्रहारचे मंगेश देवळे यांनी दिला आंदोलनाचा इशारा
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर मधील ओंकारखेडा परिसरातील विद्युत प्रवाह दररोज अचानकपणे खंडित होत असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. केव्हा केव्हा तर रात्रीच्या वेळी कित्येक तास विद्युत प्रवाह खंडित असतो. त्यामुळे लहान मुले, वृद्ध व रुग्ण यासारख्या नागरिकांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे तसेच या परिसरातील अनेक ठिकाणची विद्युत वाहीनीची तार ही जीर्ण झालेली असून खाली सैल झालेली आहे. त्यामुळे दोन विद्युत वाहीनीची तार एकमेकाला स्पर्श होऊन पार्किंग होतो व विद्युत प्रवाह बंद पडतो. काही दिवसा अगोदर शहीद उद्यान जवळ विद्युत वाहीनीची तार पार्किंग होऊन तुटून खाली पडली होती. अशातच त्यावेळी लहान मुले त्या विद्युत वाहिनीच्या खाली खेळत होते. त्यावेळी विपरीत घटना घडून जीवितहानी झाली असती. पण वेळेत यावर तोडगा न काढल्यास भविष्यात कुठलीही जीवितहानी होऊ शकते. अशा आशियाचे निवेदन प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष श्री. मंगेश देवळे यांनी महावितरणचे शहर अभियंता त्यांना दिले. तसेच सदर निवेदनात सर्व बाबीचा विचार करून ओंकारखेडा परिसरातील सतत खंडित होत असलेल्या विद्युत प्रवाह बाबतीत तांत्रिक अडचणी दूर करून अखंडपणे विद्युत प्रवाह सुरू करावा अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन केल्याशिवाय दुसरा पर्याय नसेल असा इशारा प्रहारच्या वतीने देण्यात आलेला आहे.