मायक्रो फायनान्सचे दीड लाख रुपयांचे कर्ज; तीन हप्ते थकल्याची माहिती
मागे पत्नी, १७ वर्षांची मुलगी, १२ वर्षांचा मुलगा आणि वृद्ध आई असा परिवार
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील सावंगा गुरव येथील एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संदीप अवधूत करडे (वय अंदाजे ४५ वर्षे,रा.शिलोड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे सावंगा गुरवसह शिलोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, संदीप करडे यांची शिलोड येथे अंदाजे एक हेक्टर शेती होती. त्यांच्यावर मायक्रो फायनान्स कंपनीचे सुमारे एक लाख ५० हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती आहे. कर्जाचे तीन हप्ते थकित असल्याचेही सांगण्यात येत आहे.आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे,अशी प्राथमिक चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.संदीप करडे यांच्या पश्चात पत्नी उज्वला संदीप करडे, १७ वर्षांची मुलगी, १२ वर्षांचा मुलगा आणि वृद्ध आई असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोन अल्पवयीन मुलांचे भविष्य आणि वृद्ध आईच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी, कर्जाचा वाढता बोजा आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील परिस्थिती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
