इतर फीडरना दिवसा वीज, निरसाना फीडरच्या शेतकऱ्यांच्या नशिबी रात्रीचा अंधार; सहा तास तरी दिवसा वीज देण्याची मागणी
महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांची धाव; आमदार रवी राणा यांच्या मध्यस्थीनंतर सकाळी वीज देण्याचे आश्वासन
अंजनगाव बारी /प्रतिनिधी
शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा देण्याच्या घोषणेनंतरही प्रत्यक्षात कृषी वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कायम असल्याचे चित्र निरसाना परिसरात दिसून येत आहे. महावितरणने २० ऑक्टोबर २०२६ पासून लागू केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार सातरगाव AG व पार्डी AG फीडरला सकाळी व दिवसा वीजपुरवठा दिला जात आहे. मात्र, ११ केव्ही निरसाना AG फीडरवरील वीजपुरवठा रात्री १२ ते सकाळी १० वाजेपर्यंत ठेवण्यात आल्याने निरसाना परिसरातील शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
रात्रीच्या वेळी साप, विषारी कीटक तसेच रानडुकरांसारख्या वन्यप्राण्यांचा धोका असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिवाळा व पावसाळ्यात रात्री शेतात काम करणे अधिक त्रासदायक ठरत आहे. इतर कृषी फीडरना दिवसा वीजपुरवठा मिळत असताना निरसाना फीडरच्या शेतकऱ्यांनाच रात्रीच्या वेळापत्रकाचा सामना का करावा लागत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, यासंदर्भात महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे विचारणा केली असता, कृषी वीजवाहिनीवरील अतिरिक्त भारामुळे ताण निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वेळापत्रकात बदल करण्याचे सूतोवाच करण्यात आले होते. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय गाठून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी आमदार रवी राणा यांचाही फोन आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवसापासून सकाळची वीज सुरू करण्याचे आणि लवकरच पूर्ण वेळ दिवसा वीजपुरवठा देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शेतकरी प्रशांत दारोदार यांनी दिली.

सातही दिवस दिवसा वीज मिळावी!
“महावितरण कार्यालयात सामाजिक कार्यकर्ते बंडू डकरे यांच्यासोबत जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आमदार रवी राणा यांचाही फोन आला. अधिकाऱ्यांनी सकाळची वीज देण्याचे व लवकरच पूर्ण वेळ दिवसा वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले. यासाठी रवीभाऊ राणा व बंडू डकरे यांचे आभार. मात्र, आठवड्यातील सातही दिवस दिवसा वीजपुरवठा मिळावा, ही आमची ठाम मागणी आहे.”
— प्रशांत दारोदार, शेतकरी, अंजनगाव बारी
शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून वरिष्ठांकडे पाठपुरावा करावा!
“गावातील अभियंत्यांना भेटून प्रश्न सुटेल असे वाटत नाही. गावपातळीवरील समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बडनेरा व अमरावती येथे वरिष्ठ अधीक्षक अभियंत्यांची भेट घ्यावी. केवळ मागणी करून प्रश्न सुटणार नाही, तर संघटितपणे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आता एकजूट दाखवावी.”
— मनोज इंगोले, शेतकरी, अंजनगाव बारी
१२ तासांऐवजी सहा तासांची मागणी, ही शोकांतिका!
“परिसरातील इतर भागांतील शेतकऱ्यांना १२ तास दिवसा वीजपुरवठा मिळत असताना आपल्या भागातील शेतकऱ्यांना मात्र किमान सहा तास दिवसा वीज मिळावी, अशी मागणी करावी लागत आहे. त्यातही वारंवार सात-आठ वेळा वीज खंडित होते. शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन १२ तास नियमित दिवसा वीजपुरवठा द्यावा. शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या विजेसाठीही संघर्ष करावा लागणे दुर्दैवी आहे.”
— रत्नाकर शेलोकार, शेतकरी, अंजनगाव बारी
*आश्वासनानंतरही सातही दिवस दिवसा वीज मिळण्याची प्रतीक्षा!
महावितरणने सकाळची वीज सुरू करण्याचे आश्वासन दिले असले, तरी शेतकऱ्यांची मुख्य मागणी आठवड्यातील सातही दिवस नियमित दिवसा वीजपुरवठ्याची आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत उतरते आणि निरसाना फीडरच्या शेतकऱ्यांना इतर फीडरप्रमाणे दिवसा वीज मिळते का, याकडे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
