शेतकरी सापडला दुहेरी संकटात.
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने पीक उत्पादनात घट झाली आहे.त्यातच शेतमजुरांची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे.शेतातील कामे उरकण्यासाठी शेतकऱ्यांना बाहेरगावाहून मजूर आणावे लागत असून,त्यासाठी वाहतुकीचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीपूर्वी तालुक्यातील अनेक शेतमजूर रोजगाराच्या शोधात परराज्यांत स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे गावात उपलब्ध असलेल्या मोजक्या मजुरांवर शेतीची कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आली आहे. शेतमाल काढण्याची लगबग सुरू असताना मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. स्थानिक पातळीवर मजूर उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी इतर भागांत मजुरांचा शोध घेत आहेत.त्यांना वाहनाने शेतापर्यंत आणून शेतीची कामे पूर्ण करावी लागत आहेत.मजुरांची ने-आण करण्यासाठी होणारा खर्च आणि पीक उत्पादनातील घट यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.सध्या शेतमाल काढण्याचा हंगाम सुरू असताना मजुरांची टंचाई तीव्र झाली आहे. त्यामुळे उपलब्ध मजुरांच्या मदतीने शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
स्थानिक स्तरावर मजूर मिळेना
मजूर शोधून आणावे लागत आहेत.हे स्थानिक स्तरावर मजुरांची तीव्र टंचाई असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कापूस वेचणी आणि इतर पिकांच्या काढणीसाठी बाहेरगावाहून मजूर सहज उपलब्ध होत नाहीत.त्यांना शेतापर्यंत आणण्यासाठी आणि कामावरून सोडण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करावी लागते. परिणामी,मजुरीच्या खर्चासोबतच वाहतूक आणि जेवणाचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांच्या खांद्यावर पडत आहे.
मजुरांचे स्थलांतर चिंतेची बाब
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असताना आता ग्रामीण भागात निर्माण झालेली मजूर टंचाई शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे.नांदगाव खंडेश्वर तालुक्यासह राज्यभरात रोजगाराच्या शोधात शेतमजुरांनी परराज्यात केलेले स्थलांतर ही ग्रामीण अर्थकारणासाठी चिंतेची बाब बनली आहे.
मजुरांसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.कमी पावसामुळे उत्पन्नाची खात्री नसताना वाढता खर्च शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर घालत आहे.शासनाने शेतकऱ्यांच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात.
– ज्ञानेश्वर आमडारे,शेतकरी,खंडाळा खुर्द
यंदा खरीप हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. उत्पादन खर्च वाढलेला असताना मजुरांची टंचाई जाणवत आहे. मजूर उपलब्ध होत नसल्याने बाहेरगावाहून मजूर आणावे लागत आहेत.
– अनिकेत शिरभाते,शेतकरी मंगरूळ चव्हाळा
बाहेरगावच्या मजुरांना ने-आण करण्याचा खर्च तसेच त्यांच्या जेवणाचा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही.शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला असताना हा अतिरिक्त खर्च झेपणारा नसल्याने शेतकऱ्यांना अधिकचा खर्च सुद्धा करावा लागत आहे.त्यामुळे शेतकरी चागलाच आर्थिक संकटात सापडला असून शेतकरी वर्ग हा शासनाकडून मदतीच्या अपेक्षेत असल्याचे दिसून येत आहे.
