पीकविमा रखडला; यंदा पावसानेही फिरवली पाठ
शेतकऱ्यांना शासनाच्या ठोस मदतीची अपेक्षा
अंजनगाव बारी /पवन इंगोले
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून, एकीकडे गतवर्षीच्या पीकविमा भरपाईची प्रतीक्षा कायम आहे, तर दुसरीकडे यंदा पावसाने पाठ फिरवल्याने पिकांवर संकट ओढवले आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध पिकांचे नुकसान झाले.
पाहणी आणि पंचनामे होऊनही अंजनगाव बारी परिसरातील शेतकऱ्यांना पीकविम्याची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यातच यंदा पावसाच्या अनिश्चिततेमुळे पिकांची वाढ खुंटली असून, काही भागांत पिके वाळण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गतवर्षीचा पीकविमा कधी मिळणार आणि यंदाच्या संभाव्य नुकसानीतून शेतकऱ्यांना दिलासा कसा मिळणार? असा सवाल उपस्थित होत आहे.गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीनंतर पीकविमा आर्थिक आधार ठरेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, नुकसान होऊनही भरपाईसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शेतीचा वाढता खर्च, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीसाठी केलेली गुंतवणूक यामुळे शेतकरी आधीच आर्थिक तणावात आहेत. अशा परिस्थितीत मागील वर्षाची भरपाई रखडणे आणि चालू हंगामात पावसाने दडी मारणे, यामुळे शेतकऱ्यांसमोरील संकट अधिकच गंभीर बनले आहे.

बांधावरील पाहणी पुरेशी नाही; प्रत्यक्ष मदत कधी?
यंदा पावसाच्या अनिश्चिततेमुळे पिकांची स्थिती चिंताजनक बनत असताना विविध राजकीय पक्षांचे नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहेत. प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने ही पाहणी महत्त्वाची असली, तरी त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात प्रत्यक्ष मदत पडणेही तितकेच आवश्यक आहे. केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरते मर्यादित न राहता, गतवर्षीचा प्रलंबित पीकविमा मिळवून देण्यासाठी तसेच यंदाच्या संभाव्य नुकसानीबाबत योग्य ती कार्यवाही करण्यासाठी शासन व संबंधित विमा कंपन्यांकडे ठोस पाठपुरावा होणे गरजेचे आहे.गतवर्षीच्या पीकविम्याची प्रलंबित रक्कम आणि यंदाच्या पावसाअभावी निर्माण झालेल्या संकटाचा विचार करून शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पीकविमा भरपाईबाबत स्पष्ट भूमिका घेऊन प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करावा आणि यंदाच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून नियमानुसार मदतीची कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
शेतकरी दुहेरी संकटात!
गतवर्षी अतिवृष्टी आणि यंदा पावसाची अनिश्चितता, अशा दुहेरी संकटाचा सामना अंजनगाव बारी परिसरातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे. एका वर्षाच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नसताना नव्या हंगामातील पिकेही धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेण्यासोबतच त्यांच्या हक्काचा पीकविमा मिळवून देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत. अन्यथा, नैसर्गिक संकटासोबतच आर्थिक संकटाचाही भार शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
“गतवर्षी एक रुपयात पीकविमा काढूनही भरपाई मिळाली नाही. यंदा पावसाअभावी संकट वाढल्याने तीन पिकांसाठी २,६०० रुपये भरून विमा काढला आहे. शासनाने प्रलंबित भरपाईसह यंदाच्या विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी ठोस पाठपुरावा करावा.”
— विनोद बोरकर, शेतकरी, अंजनगाव बारी
“गतवर्षीचा पीकविमा अद्याप मिळाला नाही आणि यंदा पावसाअभावी पिके संकटात आहेत. शेतीचा वाढता खर्च आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने तरी आमच्या व्यथा समजून घेऊन प्रलंबित विमा भरपाई तातडीने द्यावी.”
— टिळकराम हटवार, शेतकरी, अंजनगाव बारी
