दुष्काळ आणि महागाईच्या दुहेरी संकटात सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी.
१०० रुपयांत मिळणाऱ्या चार वस्तूंचे किट यंदा गायब
अंजनगाव बारी :- पवन इंगोले
दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि गोडधोडाचा सण! मात्र, आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गरीब कुटुंबांच्या दिवाळीवर यंदा निराशेचे सावट दिसत आहे. दिवाळीच्या काळात रेशन दुकानांतून मिळणारा ‘आनंदाचा शिधा’ उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे दुष्काळामुळे उत्पन्न घटले, तर दुसरीकडे महागाईने घरखर्च वाढवला. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची अपेक्षा असताना शिधा मिळत नसल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.
१०० रुपयांत मिळणारे चार जिन्नस यंदा गायब!
महाराष्ट्र शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’ योजनेंतर्गत यापूर्वी दिवाळी व गुढीपाडव्यासारख्या सणांच्या निमित्ताने पात्र शिधापत्रिकाधारकांना केवळ १०० रुपयांत चार जीवनावश्यक वस्तूंचे किट दिले जात होते. यामध्ये १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर आणि १ लिटर पामतेल किंवा खाद्यतेलाचा समावेश होता. अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थी तसेच शासनाने पात्र ठरविलेल्या काही भागांतील शेतकरी कार्डधारकांना रास्त भाव धान्य दुकानांमार्फत या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, यंदा दिवाळीच्या काळात हा शिधा उपलब्ध नसल्याने गरजू कुटुंबांना सवलतीच्या दरात मिळणाऱ्या या मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
महागाईने घरखर्चाचे गणित कोलमडले!
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, रोजंदारीवरील अनिश्चित उत्पन्न आणि सणासुदीचा अतिरिक्त खर्च यामुळे गरीब कुटुंबांची आर्थिक कोंडी झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना दुष्काळी परिस्थितीचाही सामना करावा लागत आहे. दिवाळीत घरात गोडधोड बनवावे, मुलांना आनंद द्यावा आणि कुटुंबासोबत सण साजरा करावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे सणाचा खर्च भागवतानाही अनेक कुटुंबांना कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत १०० रुपयांत मिळणाऱ्या चार वस्तूंच्या किटमुळे काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळत होता.
योजनेच्या सद्यस्थितीबाबत शासनाने स्पष्टता द्यावी!
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘आनंदाचा शिधा’ मिळेल, या अपेक्षेने लाभार्थी वाट पाहत असताना रेशन दुकानांत तो उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. ही योजना बंद झाली आहे की यंदा तिची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, याबाबत शासन आणि संबंधित प्रशासनाने स्पष्ट माहिती देणे आवश्यक आहे. तसेच, गरजू लाभार्थ्यांसाठी पर्यायी मदतीची व्यवस्था असल्यास त्याबाबतही माहिती जाहीर करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.दुष्काळाने उत्पन्न घटले, महागाईने खर्च वाढवला आणि आनंदाचा शिधाही मिळेनासा झाला, तर गरीबांनी दिवाळी साजरी करायची तरी कशी? असा सवाल उपस्थित होत आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ गरजूंपर्यंत वेळेत पोहोचणे आवश्यक असून, ‘आनंदाचा शिधा’ योजनेची सद्यस्थिती स्पष्ट करून गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
