सध्या वाढलेय ऊन; हवामानातील बदलामुळे नागरिक बेजार
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
यंदा उन्हाळा अन् पावसाळा अशा सलग दोन्ही ऋतूंमध्ये नागरिकांना केवळ उन्हाचाच तडाखा सहन करावा लागला आहे. सलग दोन महिने कडक ‘ऑक्टोबर हिट’चा सामना केल्यानंतर आता सर्वांचे लक्ष हिवाळ्याकडे लागले आहे. दिवाळी जवळ आली तरी दिवसभर उन्हाचा चटका कायम असल्याने यंदा खरोखरच गुलाबी थंडी अनुभवायला मिळणार की ऊन आणखी ताप देणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
ऑक्टोबर हिटचा अजून आठवडाभर तडाखा
गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या आठवडाभरातही ऑक्टोबर हिटचा चटका असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गतवर्षीच्या तुलनेत थंडी कमी राहणार?
गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकूण थंडीची तीव्र लाट थोडी कमी राहण्याची शक्यता आहे. कडाक्याची थंडी पडणाऱ्या दिवसांची संख्या कमी असेल आणि सरासरीपेक्षा थोडे जास्त किंवा उबदार तापमान राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळा
सामान्यतः हिवाळ्यात उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरतो. मात्र, सध्या वातावरणीय बदलांमुळे गुलाबी थंडी जाणवत नसल्याचे चित्र आहे.

‘एल निनो’चा हिवाळ्यावरही प्रभाव
जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या ‘एल निनो’ या हवामान घटकाचा परिणाम केवळ पावसाळ्यावरच नव्हे तर हिवाळ्यावरही दिसून येत आहे.
चांगल्या थंडीची अपेक्षा
जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाने ताण दिला असला तरी कडाक्याची आणि समाधानकारक थंडी पडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
खऱ्या थंडीला दिवाळीनंतरच सुरुवात
सध्या जरी उन्हाचा तडाखा जास्त असला तरी खऱ्या थंडीला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून म्हणजे दिवाळीनंतरच सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बाष्पीभवन रोखण्यासाठी अन् पाणीबचतीसाठी यंदा थंडी महत्त्वाची
पावसाचे प्रमाण कमी असल्याने जलाशयांमधील पाणीसाठा मर्यादित आहे. अशा परिस्थितीत जर कडक ऊन कायम राहिले, तर पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होईल.बाष्पीभवन रोखण्यासाठी आणि पाणीबचत होण्यासाठी यंदा समाधानकारक थंडी पडणे महत्त्वाचे ठरणार आहे.
