‘ऑपरेशन कवच’ बाबत ठाणेदारांनी केले जनजागृती
नांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
भारतीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात साजरा होणाऱ्या ‘राष्ट्रीय एकता दिनाचे’ औचित्य साधून मंगरुळ चवाळा येथे ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले होते. मंगरुळ चवाळा पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दौडमध्ये गावातील नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या मॅरेथॉनमध्ये जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्याचा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून देण्यात आला. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबतच गावातील तरुण वर्ग आणि ग्रामस्थही देशाच्या एकात्मतेसाठी या दौडमध्ये उत्साहाने धावले.विशेष म्हणजे, या दौड दरम्यान अमरावती ग्रामीण पोलिसांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत सायबर गुन्हेगारी, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि महिला व बालकांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करणारे विविध संदेश फलक (बॅनर्स) कार्यकर्त्यांनी व विद्यार्थ्यांनी हातात झळकावले होते. या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाच्या प्रसंगी मंगरुळ चवाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार ए. डब्ल्यू. तुळजेवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, ‘ऑपरेशन कवच’ मोहिमेचे महत्त्व पटवून दिले. सायबर फसवणूक आणि इतर सामाजिक अपप्रवृत्तींपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे आहे, असे सांगत त्यांनी या अभियानाचा संदेश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून व्यापक जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.या प्रसंगी ठाणेदार ए. डब्ल्यू. तुळजेवार यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार कोळी, पोलिस पाटील दिपक पिंपळकर, मनोज गावनेर आणि प्रशांत झोपाटे प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांनी उपस्थित राहून धावपटूंचा उत्साह वाढवला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी शाळा प्रशासनाचे प्रतिनिधी, गावातील युवक आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
