पाण्याचा ताण व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा परिणाम
कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता; शेतकरी चिंतेत
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
कापसाच्या पहिल्याच वेचणीला सुरुवात व्हायची आहे. त्यातच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बहुतांश शिवारात कपाशीचे पीक लाल व्हायला सुरुवात झाली आहे. अत्यल्प पाऊस आणि पिकाला बसलेला पाण्याचा मोठा ताण,तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. या प्रकारामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.
यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशी लागवड क्षेत्रात ५० टक्क्यांनी वाढ झाली; मात्र अल्प पाऊस, त्यात दीर्घ खंड आणि पिकाला बसलेला पाण्याचा ताण या सर्व प्रकारांमुळे कपाशी पिकाची पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही.तालुक्यात सध्या कपाशीचे पीक फूल व फळधारणेच्या अवस्थेत आहेत. झाडांना पाने व फुले असून,बोंडे पक्व होण्याच्या मार्गावर असतानाच झाडांच्या पानांचा रंग लाल व्हायला सुरुवात झाली आहे. प्रतिकूल हवामानामुळे अनेक ठिकाणी बोंडगळ देखील झाली आहे. हलक्या जमिनीतील पिकांची अवस्था अत्यंत दयनीय असून, मध्यम व भारी काळीच्या जमिनीतील पीक काहीसे तग धरून आहे.पाण्याचा ताण, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे कपाशीच्या पानांचा रंग लाल झाला आहे.

‘येलो मोजॅक’मुळे सोयाबीनही गेले
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात कापसासोबतच सोयाबीनचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सोयाबीनचे पीक कमी खर्चाचे असून, दिवाळीपूर्वी हाती येत असल्याने शेतकरी या पिकाला पहिली पसंती देतात. मात्र,पावसाचा दीर्घ खंड, प्रतिकूल हवामान आणि येलो मोझेक मुळे सोयाबीनचेही पीक खराब झाले आहे. ही दोन्ही नगदी पिके हातची गेल्याने शेतकरी चिंतित आहेत.
या उपाययोजना करा !
पावसाचा खंड तसेच मॅग्नेशियम व बोरान या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पानांमधील हरितद्रव्य कमी होते व पाने लाल होऊन पीक अकाली सुकू लागते. यातून पिकाला वाचविण्यासाठी पिकावर मॅग्नेशियम व बोरान तसेच बुरशीनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे. किडी व मावा-तुडतुड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच फवारणी करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
मॅग्नेशियम,बोरान या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवली आहे. उत्पादनात घट येऊ शकते. शेतकऱ्यांनी नत्रयुक्त खतांचा वापर केल्यास लाल्याचा प्रादुर्भाव कमी होतो.
विकास पाटील,तालुका कृषी अधिकारी, नांदगाव खंडेश्वर
कापसाचा अद्याप एकही वेचा झाला नाही. त्यातच लाल्यामुळे पीक सुकायला लागले आहे. त्यामुळे कापसाचे मोठ्या मुश्किलीने एकरी १ ते २ क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन होणार नाही.
अनिकेत शिरभाते,शेतकरी,मंगरूळ चव्हाळा
