नवरात्रोत्सवात भाविकांची मांदियाळी; अखंड ज्योत, भजन-आरतीने अरण्य परिसर भक्तिमय
२३ ऑक्टोबरला भव्य महाप्रसादाचे आयोजन
अंजनगाव बारी/ पवन इंगोले
अंजनगाव बारी गावापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर अरण्यातील भव्य टेकडीवर राणामातेचे प्राचीन श्रद्धास्थान आहे. हजारो वर्षांची परंपरा असल्याचे मानले जाणारे हे ठिकाण परिसरातील भाविकांसाठी श्रद्धेचे आणि भक्तीचे केंद्र बनले आहे. ‘जागृत देवस्थान’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत असून, भजन, आरती आणि अखंड ज्योतीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जात आहे.
राणामाय टेकडीवरील या प्राचीन श्रद्धास्थानाला गेल्या १६ वर्षांत युवा पिढीच्या पुढाकारातून नवे स्वरूप प्राप्त झाले. मंदिराचा जीर्णोद्धार करून येथे राणामातेच्या मंदिराची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी नवरात्रोत्सवात घटस्थापना करून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सुमारे १२५ फूट उंचीच्या या टेकडीच्या पायथ्याशी राणामातेचे मंदिर असून, या टेकडीचा संबंध प्राचीन संस्कृतीशी असावा, अशी स्थानिकांकडून धारणा व्यक्त केली जाते.राणामाय टेकडीविषयी परिसरात अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. या टेकडीच्या आत मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा असल्याची लोककथा सांगितली जाते.

या खजिन्याच्या संरक्षणासाठी राणामाता टेकडीच्या शिखरावर नसून पायथ्याशी विराजमान असल्याचीही स्थानिकांमध्ये मान्यता आहे. मंदिरासमोर असलेला जलकुंभ हे या ठिकाणाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हा जलकुंभ कधीही आटत नसल्याची स्थानिकांची धारणा असून, उन्हाळ्यात गुरेढोरे पाणी पिण्यासाठी त्याचा उपयोग होतो.राणामाय मंदिराच्या शेजारील टेकडीवर श्री चक्रधर स्वामींचे मंदिर आहे. विशेष म्हणजे, अंजनगाव बारी येथील भवानीमाता मंदिराजवळही श्री चक्रधर स्वामींचे मंदिर आहे. पौराणिक कथेनुसार, माता रुक्मिणी रागावून कौंडण्यपूर येथे माहेरी जात असताना अंजनगाव बारीतील या दोन ठिकाणी थांबल्या होत्या. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीचा शोध घेत येथे आले, अशी आख्यायिका सांगितली जाते.या धार्मिक परंपरेमुळे भवानीमाता आणि राणामाता यांना देवी रुक्मिणीचे स्वरूप मानले जाते. शेजारी असलेल्या श्री चक्रधर स्वामींच्या मंदिरातील कृष्णमूर्तीमुळे या परिसराला धार्मिक आणि पौराणिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या श्रद्धा आणि आख्यायिका आजही भाविकांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहेत.नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत राणामाय टेकडीवर अखंड ज्योत प्रज्वलित ठेवली जाते. दररोज भजन, आरती, महाप्रसाद आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण टेकडी उजळून निघते. अरण्यातील हा परिसर भाविकांच्या गर्दीने आणि भक्तिमय वातावरणाने जणू एखाद्या वस्तीप्रमाणे गजबजून जातो राणामाय टेकडी, श्री चक्रधर स्वामी मंदिर आणि गैबी शहा दर्गा ही तीन धार्मिक स्थळे या परिसराचे विशेष वैशिष्ट्य आहे. धार्मिक सलोखा, प्राचीन परंपरा आणि निसर्गरम्य वातावरणामुळे हा परिसर अमरावती जिल्ह्यातील भाविकांसाठी श्रद्धेचे महत्त्वपूर्ण स्थान ठरला आहे. वर्षभर अनेक भाविक आणि पर्यटक येथे दर्शनासाठी तसेच परिसरातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी येत असतात.प्राचीन श्रद्धेचा वारसा, निसर्गाचे सान्निध्य आणि नवरात्रोत्सवातील भक्तीचा उत्साह यांचा सुंदर संगम म्हणजे अंजनगाव बारी येथील राणामाय टेकडी होय.
२३ ऑक्टोबरला महाप्रसादाचे आयोजन
नवरात्रोत्सवानिमित्त शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता राणामाय माता मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अंजनगाव बारी ते कोंडेश्वर रोडवर गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरात सर्व भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून मातेचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.
