४०० वर्षांची परंपरा कायम; घटस्थापनेसह नवरात्रोत्सवाला प्रारंभ,
गावात १० सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांचा उत्साह
अंजनगाव बारी / पवन इंगोले
अंजनगाव बारी येथील सर्वाधिक लोकवस्ती असलेल्या भवानीपुरा परिसरात श्री जय भवानी माता मंदिर हे प्राचीन आणि समस्त ग्रामवासीयांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराचा इतिहास सुमारे ४०० वर्षे जुना असल्याचे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात येथे भवानी मातेची प्रतिष्ठापना झाल्याची स्थानिक परंपरा असून, तेव्हापासून नवरात्रोत्सवाची परंपरा आजतागायत कायम असल्याचे सांगण्यात येते.

अखंड ज्योत आणि नवरात्रोत्सवाची परंपरा
श्री जय भवानी माता मंदिरात घटस्थापनेसह नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या काळात मंदिरात अखंड ज्योत प्रज्वलित ठेवली जाते. अंजनगाव बारीसह परिसरातील खेड्यापाड्यांतून भाविक मोठ्या श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी येतात. विजयादशमीच्या दिवशी येथे हजारो भाविकांची उपस्थिती असते. देवीच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
शेजारीच महानुभाव पंथाचे मंदिर
श्री जय भवानी माता मंदिराला लागूनच महानुभाव पंथाचे मंदिर असून, येथे श्रीकृष्णाची मूर्ती विराजमान आहे. श्री चक्रधर स्वामींशी संबंधित परंपरा लाभलेल्या या मंदिरामुळे परिसराला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाच्या काळात भक्तिमय वातावरण निर्माण होते.
१० सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांमुळे गावात भक्तिमय वातावरण!
अंजनगाव बारी येथे नवरात्रोत्सवानिमित्त एकूण १० सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांच्या माध्यमातून दुर्गामातेची आराधना केली जाते. यामध्ये नवशक्ती नवदुर्गा दुर्गोत्सव मंडळ, सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ, शिवाजी दुर्गोत्सव मंडळ, वीर भगतसिंग दुर्गोत्सव मंडळ, नवहर्ष दुर्गोत्सव मंडळ, एकता दुर्गोत्सव मंडळ, आसरा दुर्गोत्सव मंडळ, वीर चंद्रशेखर आझाद दुर्गोत्सव मंडळ, बाल दुर्गोत्सव मंडळ आणि न्यू बालवीर दुर्गोत्सव मंडळ यांचा समावेश आहे.या मंडळांच्या वतीने नवरात्रोत्सवात देवीची स्थापना, पूजाअर्चा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नऊ दिवस गावातील वातावरण भक्तिमय बनते. मंडळांच्या सहभागामुळे नवरात्रोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले असून, नागरिक आणि युवकांचा उत्साहही दिसून येतो.
परिसरातील देवींच्या श्रद्धास्थानांची समृद्ध परंपरा
अंजनगाव बारी व परिसराला देवींच्या उपासनेची समृद्ध परंपरा लाभली आहे. गावात मरामाय माता मंदिर, मरीमाय माता मंदिर, तेलामाय माता मंदिर, रानामाय माता मंदिर, रामगीर महाराज देवस्थानातील देवी मंदिर आणि दुर्गामाता मंदिर अशी विविध श्रद्धास्थाने आहेत. तसेच पार्डी (देवी) येथील गंगा-जमुना देवी मंदिर आणि मालखेड (रेल्वे) येथील शिव व अंबा माता मंदिर ही परिसरातील भाविकांची श्रद्धास्थाने आहेत.चारशे वर्षांची परंपरा, देवीवरील अढळ श्रद्धा आणि दहा सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांचा उत्साह यांमुळे अंजनगाव बारीच्या नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारा हा उत्सव गावाच्या एकतेचे व सामूहिक भक्तिभावाचे प्रतीक ठरत आहे.
