नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात तेलवर्गीय पिकांचा पेरा दिवसेंदिवस घटत चालल्याने पारंपारिक व वडीलोपार्जित चालणारा ग्रामीण भागातील तेल घाणीच्या व्यवसायाला अखेरची घरघर लागली. तेलवर्गीय पिकांचा पेरा घटत असून आता शेतकऱ्यांचा कापूस, तूर, ज्वारी आदी पिके घेण्याकडे वाढला आहे. ग्रामीण भागात तेलवर्गीय पिकांवर तेल काढण्याच्या व्यवसायात असंख्य कुटुंबे शुद्ध व नैसर्गिकरीत्या उत्पादित खाद्यतेलांची तेलघाणीतून निर्मित करायचे. शरीराला फायदेशीर व आरोग्यदायी ठरणाऱ्या या तेलाला खूप मागणी असायची. पारंपारिक व वडिलोपार्जित व्यवसाय असल्याने यात पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय हमखास करायचे. पूर्वी कोरडवाहू शेतीत पीक म्हणून करडईचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असायचा करडई, सोयाबीन, सूर्यफुल यांना अपेक्षित दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना हे पिके परवडणारे ठरत होते. परंतु दिवसेंदिवस पावसाची होणारी घट व सततच्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने शेती व्यवसाय डबघाईस आला. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बेताची होत चालली. तसेच करडई व तेलवर्गीय पिकांना बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. शेतीवर झालेला खर्च सुध्दा निघेना. ही सर्व कारणे तेलघाणी बंद होण्यास कारणीभूत ठरलेली असल्याचे दिसते.
तसेच काळानुसार झालेला बदल हा माणसाच्या खान्यापिन्यावर पण झालेला दिसतो. पूर्वी बहुतांशी ग्राहक हे तेलघाणीव्दारे तयार झालेला करडईच्या तेल दैनदिन खाण्यामध्ये वापर करायचे. परंतु आता आधुनिक पद्धतीने तयार झालेल्या तेलाचा वापर शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही वाढला आहे. करडई, सोयाबीन, सूर्यफुल, भुईमुग आदी पिके न घेण्यासाठी बाजारात तेलवर्गीय पिकांना मिळणारा कमी दर असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.तूर, मूग यासारख्या कडधान्याला सरकारने हमीभाव देण्यासाठी पुढाकार घेऊन खरेदी केंद्रे सुरू केली. यामुळे कडधान्याला चांगले दर मिळत आहेत परंतु तेलवर्गीय पिकांना अपेक्षित दर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. परिणामी तेलवर्गीय पिकांना हभीमाव मिळाला तर तेलवर्गीय पिके वाचू शकतील, त्यामुळे बाजार समितीत करडई खरेदी केंद्र सुरू करून त्याला हमीभाव मिळावा अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे.करडईपासून खाद्यतेल बनविले जाते आहे. वस्तुस्थिती पाहता खाद्यतेलांच्या किमतीत सातत्याने कायमच वाढ होते आहे. त्यानुसार तेलवर्गीय पिकांच्या खरेदी दरात वाढीसाठी शासनाकडून प्रयत्न होताना दिसत नाही.तालुक्यात पूर्वी करडईचे पीक घेतले जात होते,ग्रामीण भागात घरगुती तेल घाणा होते.परंतु त्याला चालना नसल्याने ते बंद झाले, बंद झालेल्या उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.
