कायदा-सुव्यवस्थेवर अतिरिक्त ताण; कार्यरत पाटलांवर दुहेरी जबाबदारी.
पदे भरण्यासाठी प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही नाही.
नांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिस पाटलांची तब्बल ३५ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे पदे रिक्त असून, त्याचा अतिरिक्त भार लगतच्या गावातील कार्यरत पोलिस पाटलांवर सोपविण्यात आला आहे. परिणामी कार्यरत पोलिस पाटलांवर कामाचा ताण वाढला असून, त्याचा थेट परिणाम ग्रामस्थांच्या दैनंदिन शासकीय कामांवर तसेच गावातील कायदा-सुव्यवस्थेवर होत असल्याची स्थिती आहे.
पोलिस पाटील हा गावपातळीवरील प्रशासन आणि पोलिस यंत्रणेतील महत्त्वाचा दुवा मानला जातो. गावातील शांतता व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीविषयक माहिती पोलिस प्रशासनाला देणे, शस्त्रबंदी कायद्याच्या पालनावर लक्ष ठेवणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, बेवारस मालमत्तेची माहिती देणे तसेच नैसर्गिक आपत्ती किंवा साथीच्या आजारांच्या काळात प्रशासनाला सहकार्य करणे, अशी विविध जबाबदारी पोलिस पाटलांवर असते.महाराष्ट्र ग्रामपोलिस अधिनियम १९६७ अंतर्गत पोलिस पाटील कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काम करतात. मात्र, मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्याने उपलब्ध मनुष्यबळावरच अतिरिक्त जबाबदारीचा भार टाकला जात आहे. त्यामुळे ‘एक पाटील, दोन गावांची जबाबदारी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

ग्रामस्थांची मोठी गैरसोय.
पोलिस पाटील पद रिक्त असलेल्या गावांतील ग्रामस्थांना विविध शासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असलेले रहिवासी दाखले, वंशावळीसह विविध कागदपत्रांच्या प्रक्रियेत पोलिस पाटलांची आवश्यकता भासते. मात्र, अतिरिक्त पदभार असलेल्या पोलिस पाटलांना दोन गावांमध्ये समन्वय साधताना मोठी कसरत करावी लागत असल्याने ग्रामस्थांना अनेकदा हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार आहे.
नांदगाव खंडेश्वर हद्दीत १४, लोणी टाकळीत १६ पदे रिक्त
तालुक्यातील तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत. नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४, लोणी (टाकळी) पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६, तर मंगरूळ चव्हाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ५ पोलिस पाटलांची पदे रिक्त आहेत. अशाप्रकारे तालुक्यात एकूण ३५ पदे रिक्त आहेत.विशेष म्हणजे, या गावांतील लोकसंख्या मोठी असल्याने दैनंदिन कामकाजाचा व्यापही मोठा आहे. अशा परिस्थितीत अतिरिक्त गावाचा पदभार सांभाळणाऱ्या पोलिस पाटलांना दोन्ही गावांतील नागरिकांशी संपर्क ठेवणे, पोलिस व महसूल प्रशासनाला माहिती पुरविणे आणि नियमित कामकाज पार पाडणे कठीण जात आहे.
प्रशासनाच्या कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष.
पोलिस पाटील हे ग्रामीण प्रशासनातील महत्त्वाचे पद असताना तब्बल ३५ पदे रिक्त असणे ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. पदे रिक्त राहिल्याने कार्यरत पोलिस पाटलांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे, तर दुसरीकडे संबंधित गावांतील नागरिकांनाही त्याचा फटका बसत आहे.रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी प्रशासनाने भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. कायदा-सुव्यवस्था, ग्रामस्थांची गैरसोय आणि कार्यरत पोलिस पाटलांवरील वाढता कामाचा ताण लक्षात घेता प्रशासन याबाबत केव्हा ठोस निर्णय घेते, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
