नांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाला उजाळा मिळतो. बदलत्या काळानुसार सण साजरा करण्याच्या पद्धतीत बदल झाला असला, तरी राखीच्या धाग्याने जोडलेले हे नाते आजही तितकेच घट्ट आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने भाऊ-बहिणी वेगवेगळ्या शहरांत राहत असले तरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने एकमेकांची आठवण आणि भेटीची ओढ कायम असते.

अंतर वाढले, तरी आपुलकी कायम
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भाऊ-बहिणींना दररोज भेटणे शक्य होत नाही. काही जण शिक्षणासाठी, तर काही नोकरीनिमित्ताने घरापासून दूर आहेत. अशा परिस्थितीत फोन, व्हिडिओ कॉल तसेच कुरिअरने पाठविलेली राखी या माध्यमातून रक्षाबंधनाचा आनंद साजरा केला जातो. हातावर बांधला जाणारा राखीचा धागा छोटा असला, तरी त्यामागील भावना मोठी आहे.रक्षाबंधनाचे स्वरूपही काळानुसार बदलत आहे. पूर्वी भावाने बहिणीचे रक्षण करावे, अशी या सणामागील प्रमुख भावना मानली जात होती. मात्र आता भाऊ आणि बहीण एकमेकांना आधार, प्रेरणा आणि आत्मविश्वास देणारे नाते म्हणून रक्षाबंधनाकडे पाहतात. त्यामुळे हे नाते केवळ संरक्षणापुरते मर्यादित न राहता समानतेचे आणि परस्पर विश्वासाचे प्रतीक बनले आहे
भांडणांपलीकडचे प्रेम
भाऊ-बहिणीमध्ये किरकोळ कारणांवरून भांडणे, चेष्टा-मस्करी होत असली, तरी अडचणीच्या काळात एकमेकांसाठी सर्वप्रथम धावून जाणारेही तेच असतात. अनेक भावना शब्दांत व्यक्त होत नसल्या तरी छोट्या-छोट्या कृतींतून प्रेम जाणवत राहते. रक्षाबंधन हा या न बोललेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस ठरतो.नोकरीच्या निमित्ताने पुण्यात राहणाऱ्या तेजस कावरे याच्यासाठी यंदाचे रक्षाबंधन विशेष ठरणार आहे. घरी जाता येत नसल्याने त्याच्या बहिणीने स्वतः तयार केलेली राखी पुण्यात पाठविली आहे. अंतर कितीही असले तरी अशा आठवणी आणि प्रेमाच्या धाग्यामुळे भाऊ-बहिणीचे नाते अधिक घट्ट होत असल्याचे चित्र आहे.रक्षाबंधनाच्या निमित्ताने भेटवस्तू, गोडधोड किंवा औपचारिक शुभेच्छांपेक्षा नात्यातील विश्वास आणि एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याची भावना अधिक महत्त्वाची ठरते. म्हणूनच काळ बदलला, अंतर वाढले आणि संवादाची साधने बदलली तरी राखीचा धागा भाऊ-बहिणीच्या प्रेमाची वीण घट्ट करणारा धागाच राहिला आहे.
