
दर्यापूर / तालुका प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दर्यापूर-अंजनगाव विधानसभा अध्यक्षपदी प्रा.डॉ.सुशिल गावंडे यांची निवड झाल्यानंतर, जे. डी. पाटील सांगूळूदकर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी व वर्गमित्रांनी दिलेल्या अभिनंदनातून एका जुनी, पण आजही प्रेरणादायी सामाजिक चळवळीची आठवण पुन्हा जागी झाली आहे.“युवा सहयोग” या महाविद्यालयीन काळात स्थापन झालेल्या सामाजिक संघटनेची.प्रमोद मिसाळ, मंगेश होले, ॲड. नंदकिशोर रायकवार, दिनेश पळसपगार, सोपान गोंडचर आणि ॲड. हर्षवर्धन कोलखेडे या सर्व वर्गमित्रांनी दिलेल्या मनापासूनच्या शुभेच्छांमुळे केवळ वैयक्तिक गौरव नव्हे, तर सामाजिक जबाबदारीची जाणीव पुन्हा ठळक झाली.
महाविद्यालयीन जीवनात ॲड. सदानंद जाधव अध्यक्ष आणि प्रा. डॉ. सुशिल गावंडे कार्याध्यक्ष असलेल्या “युवा सहयोग” या संघटनेने अनेक सामाजिक उपक्रमांची मुहूर्तमेढ रोवली होती. त्या काळातील समाजभान, तळमळ आणि क्रियाशीलता अजूनही आठवते आणि प्रेरणा देते, असे ते म्हणाले.आज पुन्हा एकदा जुन्या सहकाऱ्यांकडून या संघटनेला नव्याने सुरू करण्याचा आग्रह व्यक्त होत आहे.
“युवा सहयोग ही केवळ आठवण नाही, ती एक चळवळ होती – आणि पुन्हा होऊ शकते,” असे ते म्हणतात.
या पार्श्वभूमीवर, “जर ईश्वराची इच्छा आणि सर्व मित्रांचे सहकार्य लाभले, तर ‘युवा सहयोग’ पुन्हा नव्या जोमाने कार्यरत होईल,” असे संकेतही त्यांनी दिले आहेत.या संघटनेच्या पुनरुज्जीवनामधून नव्या पिढीला सामाजिक बांधिलकीची शिकवण आणि सक्रियतेचा एक नवा आदर्श मिळू शकतो, असा विश्वास व्यक्त होत आहे.