
पावसाअभावी शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर
शेतकरी पाहतोय चातका सारखी पावसाची वाट!
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
खरिपाच्या हंगामाला सुरुवात होऊन एक महिना उलटून गेला असताना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने पाठ फिरवली आहे. मागील १० ते १२ दिवसांपासून मुसळधार तर दूरच ढगांच्या छायाही दिसेनाशा झाल्या आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतीची निंदन,डवरणे,आणि मशागती पूर्ण करून शेतकरी पिकांच्या वाढीकडे पाहत होते मात्र पावसाच्या उशिरामुळे पिकांवर ताण निर्माण झाला आहे.
पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांची धावपळ सोयाबीन,कपाशी,मका यांसारख्या खरीप पिकांना या टप्प्यावर पुरेसं पाणी मिळणं अत्यंत गरजेचं आहे.मात्र सध्याच्या हवामानामुळे पिकांची वाढ खुंटली आहे.अनेक ठिकाणी सोयाबीनच्या पानांनी वळण घेण्यास सुरुवात केली आहे.काही ठिकाणी पाने उलटी पडत आहेत तर काही भागांत पिके सुकायला लागली आहेत.नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गावामध्ये मागील १२ दिवसांपासून एक थेंब पाऊसही न झाल्याने शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे.लवकरात लवकर पाऊस न झाल्यास पिके वाचणार नाहीत.पाण्याच्या कमतरतेमुळे पिकांमध्ये जमिनीतील ओलसरपणा पूर्णपणे संपला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या पातळीवर विहिरी आणि बोरवेलच्या मदतीने ओलीत करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. मात्र अनेक ठिकाणी विजेचा पुरवठा अनियमित असल्याने रात्री जागरण करून पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तीन दिवस दिवसा आणि तीन दिवस रात्री असे शिफ्टमध्ये ओलीत चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्यही ढासळत आहे.तालुक्यातील बहुतांश शेतजमिनी कोरडवाहू असून वरच्या पावसावर संपूर्ण अवलंबून असते ज्यांच्याकडे सिंचनाची कोणतीही सोय नाही त्यांच्यासाठी पावसाशिवाय दुसरा पर्यायच नाही.आधीच बियाण्यांच्या, खतांच्या व इतर शेतीसाहित्यांच्या महागाईने शेतकरी कर्जात बुडालेला आहे.आता पावसाचा उशिरही त्यांच्या डोळ्यांपुढे अंधार करत आहे.हवामानात उष्णपण वाढला असून आकाश निरभ्र असल्याने सध्या हवामानाने तापमानात अधिकच उकाडा वाढवला आहे.दिवसाचे तापमान ३६-३८ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.
उन्हाच्या कडाक्यामुळे जमिनीतही उष्मा वाढत असून याचा प्रतिकूल परिणाम पिकांवर होत आहे. आकाश निरभ्र असल्याने कुठेही ढग दिसत नाहीत की,विजांचा कडकडाट नाही, वाऱ्याची गतीही मंद आहे यामुळे लवकर पाऊस येण्याची चिन्हं सध्यातरी दिसत नाहीत.या कठीण परिस्थितीत शेतकरी आपापल्या परीने देवाला साकडे घालत आहेत. अनेक गावांमध्ये मुलांनी पारंपरिक “ओल्या मातीचे खेळ”, “पाणी मागणं“, तर काही ठिकाणी महिलांनी गावातील देवस्थानात नवस बोलणे भजन,कीर्तन,हवन अशा धार्मिक उपक्रमांद्वारे पावसासाठी प्रार्थना केली आहे.”पावसाविना आमचं आयुष्य थांबलेलं आहे देवाने आता तरी ऐकावं,” असा सूर सर्वत्र ऐकायला मिळतो.या स्थितीत स्थानिक प्रशासन व कृषी विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. जर आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर पंचनामे करून मदत जाहीर करण्याची तयारी प्रशासनाने ठेवावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कर्जात बुडालेल्या आणि निसर्गाच्या लहरीपुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना या स्थितीत शासनाने आधार द्यावा.अशी मागणी शेतकरी वर्गाकडून आता जोर धरू लागली आहे.
> सोयाबीनच्या पान उलटी झाली आहेत अजून चार दिवस असंच राहिलं तर पूर्ण पीक हातातून जाईल.शेतातील कामे पूर्ण झाली असल्याने आता फक्त आणि फक्त पावसाची वाट आहे लवकरच पाऊस झाला नाही तर आमच्या शेतातील पिके सुकून आम्हाला दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.
अनिकेत शिरभाते, शेतकरी,मंगरूळ चव्हाळा
पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. निसर्गाची कुरबूर आणि शासनाची उदासीनता या दोन्हींचा फटका त्यांना बसतोय. “येरे येरे पावसा…” ही केवळ कविता राहू नये तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचा शिडकावा करणारा पाऊस लवकरच यावा.हीच साऱ्यांची मनोमन इच्छा आहे.
सुशील थोरात,शेतकरी,धानोरा फसी.
👌👍