वेणी गणेशपुर गावात पसरली शोककळा
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेणी गणेशपूर गावात महिला शेतकरी ज्योत्स्ना भोयर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षांपासून पिकांची सतत नापिकी होत होती शेतमालाला योग्य असा हमीभाव न मिळाल्याने त्यांना शेतीतून उत्पन्नाचे समाधानकारक साधन उपलब्ध होत नव्हते. याचबरोबर शासकीय व खाजगी बँकांचे मिळून २ लाख ९० हजार रुपयांचे कर्ज थकीत असल्याने त्या तीव्र मानसिक तणावाखाली होत्या.

ज्योत्स्ना भोयर यांच्या पतीचे निधन झाल्याने संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरच होती. शुभम व गौरव अशी दोन मुले असून त्यांच्या शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारीही त्यांच्यावरच होती. या सर्व विवंचनेला कंटाळून त्यांनी राहत्या घरी विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली.ही घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून तीव्र दुःख व्यक्त केले जात असून महिला शेतकरी आत्महत्या हा वाढता गंभीर विषय ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.गावकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे की,शेतमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा,शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे ठोस धोरण राबवण्यात यावे,तसेच महिला शेतकऱ्यांसाठी विशेष सहाय्य योजना लागू करण्यात यावी.यामुळे भविष्यात अशा हृदयद्रावक घटना घडू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
