
वनविभागाकडून ठोस उपाययोजना नाही
तालुक्यातील अधिकारी आहेत तरी कुठे ? शेतकऱ्यांचा प्रश्न
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर,पापल,वाढोना रामनाथ,मंगरूळ चवाला,वेणी गणेशपुर,या परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच असून यामुळे तालुक्यातील शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत.रोही,हरीण,डुक्कर आणि माकड यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.या प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे.माहुली चोर परिसरात वनविभागाच्या मालकीचे बाभुळ बन व विस्तृत जंगलक्षेत्र आहे.
याच भागात वरील वन्यप्राण्यांचा मुक्त संचार होत असून हे प्राणी दिवसा व रात्री शेतांमध्ये प्रवेश करून नुकसान करतात.माकडांचा त्रास मुख्यत्वे दिवसा तर रोही,हरीण व डुक्कर यांचा त्रास रात्री असतो.पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी रात्री उशिरापर्यंत काही वेळा पूर्ण रात्र शेतात जागून पहारा करतात.तरीसुद्धा हे प्राणी नजर चुकवून शेतात शिरून नुकसान करतात.विशेष म्हणजे हे प्राणी एकाचवेळी संपूर्ण शेतात नुकसान न करता रोज वेगवेगळ्या भागात नुकसान करत असल्यामुळे पंचनाम्याच्या वेळी संपूर्ण नुकसान स्पष्टपणे समोर येत नाही.वनविभाग कृषी विभाग व महसूल विभागाच्या संयुक्त पंचनाम्यात कृषी सहाय्यक केवळ नुकसानीच्या दिसणाऱ्या भागाची नोंद करतात ज्या पिकावर आधी नुकसान झालेले असते त्या पिकाला नवीन पालवी आलेली असल्यामुळे त्यावेळी ते नुकसान नोंदवले जात नाही.परिणामी शेतकऱ्यांना मिळणारी नुकसानभरपाई अत्यंत अल्प असते.पंचनामा झाल्यानंतरही या प्राण्यांचा त्रास सुरूच राहतो.मात्र शेतकरी पुन्हा तक्रार करण्याचे टाळतात.त्यामुळे वनविभागाने तातडीने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा तसेच पंचनाम्याच्या वेळी संपूर्ण आणि योग्य नुकसान नोंदवावे अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.शेतकऱ्यांचे जीवनमान टिकवण्यासाठी आणि शेतीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी वनविभागाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
–पापळ परिसरात रोही, रानडुक्कर,वानर,हरीण सोबतच सायलचे प्रमाण खुप जास्त वाढले आहे सध्या पाऊस नसल्याने पिकांची अवस्था फारच गंभीर आहे,सोयाबीनवर बुरशी पडल्यावर अनेक झाडे वाळत आहेत, एकंदरीत निसर्ग कोपलेला असुन पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटलेली आहे.वन्य प्राणी हे शेत्तात येऊन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत.
श्रीकांत जूननकर,शेतकरी,पापळ