
तात्काळ मोबदला द्या,अन्यथा शेतकऱ्यांचे उपोषण
वनविभागाचे अधिकारी फिरकायलाही तयार नाहीत
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाला,तुळजापूर,अर्जुनपूर,हरणी,सालोड,शिवरा,पिंपळगाव निपाणी इत्यादी गावच्या परिसरातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.जुलै 2025 मध्ये झालेल्या पेरणीनंतर शेतातील पिके चांगली वाढली असताना वन विभागाच्या हद्दीतून येणारे रानडुक्कर,हरिण,माकड,निलगाय (रोही) आणि इतर वन्यप्राणी दिवसाढवळ्या तसेच रात्री शेतात येऊन उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत.
विशेषतःनिलगाय (रोही) हे प्राणी शेतात घुसून पिके तुडवतात आणि उभे पीक अक्षरशः उध्वस्त करून टाकतात.यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत वनविभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.त्याचबरोबर वन्यप्राण्यांचा वावर रोखण्यासाठी वन विभागाच्या हद्दीतील जंगलांच्या सभोवताली मजबूत तार कंपाउंड लावण्याचीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच वनरक्षकांनी गावोगाव जाऊन पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
जर वरील मागण्या तात्काळ मान्य करून अंमलात आणल्या नाहीत, तर मंगरूळ चव्हाळा परिसरातील शेतकरी उपोषणाच्या मार्गाने जाण्याचा इशारा देत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्या अशी ग्रामस्थांची मागणी आहे.