शेतकऱ्यांची बाजारात धावपळ
पावसाच्या अंदाजामुळे हार्वेस्टरने तातडीने काढणी
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
अवकाळी पावसाचा अंदाज जाहीर झाल्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये गहू व चणा काढणीची लगबग वाढली आहे. १६ तारखेपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकरी गहू व चणा लवकरात लवकर काढण्यासाठी शेतकरी मजुरासह हार्वेस्टर आणि थ्रेशरच्या साहाय्याने शेतात धावपळ करताना दिसत आहेत.सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी गहू पूर्णपणे पिकलेला नसून थोडाफार हिरवाच असताना काढणी केली जात आहे. काढलेला गहू ओलसरअसल्यामुळे शेतकऱ्यांना तो साठवून ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे काढणी होताच शेतकरी तातडीने आपला माल बाजारात विक्रीसाठी नेत आहेत. परिणामी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे.सध्या बाजारात गव्हाला साधारण १८०० ते २००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मात्र माल ओलसर असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून कमी भाव दिला जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. चार महिन्यांच्या कष्टानंतर तयार झालेला गहू अवकाळी पावसामुळे खराब होईल या भीतीने शेतकरी चागलाच चिंतेत आहे. “हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हातातून निसटू नये,” अशी भावना अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत.गहू आणि चणा पिके अवकाळी पावसामुळे खराब होऊ नयेत म्हणून शेतकरी हार्वेस्टर आणि हळंबा थ्रेशरच्या सहाय्याने तातडीने काढणी करत आहेत. दरम्यान, बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने व्यापारी याचा फायदा घेत असल्याचीही चर्चा शेतकरी वर्गात आहे.यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये आणि ओलसर मालाबाबत योग्य तो तोडगा काढावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
