नगरसेविका प्रांजली गुल्हाने यांची समितीच्या तातडीच्या बैठकीची मागणी
नांदगाव खंडेश्वर ( तालुका प्रतिनिधी )
नांदगाव खंडेश्वर स्थानिक नगर पंचायत क्षेत्रातील पाणीपुरवठा योजना सध्या विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींच्या विळख्यात सापडली असून, शहरातील अनेक प्रभागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांनी पाणी पुरवठा व जलनिस्तारण समितीच्या सभापतींना पत्र लिहून समितीची तातडीची विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरात ठराविक प्रभागांमध्ये पाणी वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. विशेषतः उन्हाळा तोंडावर असताना उद्भवलेली ही समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे. या समस्यांवर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आणि पाणीपुरवठा योजनेला गती देण्यासाठी ही बैठक होणे आवश्यक असल्याचे गुल्हाने यांनी पत्रात नमूद केले आहे.
बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर चर्चेचा आग्रह:
नगरसेविका प्रांजली गुल्हाने यांनी पत्रात प्रामुख्याने चार विषयांवर चर्चा करण्याची मागणी केली आहे:
१. पाणीपुरवठा योजनेचा सद्यस्थितीतील प्रगती अहवाल सादर करणे.
२. पाणी विस्कळीत होण्याची नेमकी कारणे शोधून त्यावर ठोस उपाय करणे.
३. आगामी उन्हाळ्यासाठी पाणी टंचाईचे सूक्ष्म नियोजन करणे.
४. दुरुस्ती व देखभालीसाठी आवश्यक निधी आणि तांत्रिक कामांचा आढावा घेणे.
लोकहित लक्षात घेता तातडीने निर्णय घेण्याची विनंती
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत, पुढील २ ते ३ दिवसांत ही विशेष बैठक बोलवावी,अशी विनंती सौ. गुल्हाने यांनी सभापतींना केली आहे. तसेच, या संदर्भात प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची प्रत माहितीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आता नगर पंचायत प्रशासन आणि पाणीपुरवठा समिती यावर काय पावले उचलते, याकडे नांदगाव खंडेश्वरवासीयांचे लक्ष लागले आहे.
