प्रभात फेरी,जलबंधन,जल शपथ,पाणी तपासणी प्रात्यक्षिकाचे आयोजन
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजना आता संचालन व देखभाल-दुरुस्तीच्या टप्प्यात प्रवेश करत असून, या योजनांचे जबाबदारीपूर्वक हस्तांतरण व्हावे आणि ग्रामस्थांनी त्यांची शाश्वत देखभाल करावी या हेतूने अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मांजरी म्हासला व अमरावती तालुक्यातील वडगाव माहोरे येथे ‘जल अर्पण दिवस’ विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) बाळासाहेब रायबोले तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता स्नेहा धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान ग्रामसभेत पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. योजनेची रचना, पाणी स्रोत, शुद्धीकरण प्रक्रिया, वितरण व्यवस्था तसेच भविष्यातील देखभाल-दुरुस्तीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व योजना कायमस्वरूपी सुरळीत चालू ठेवण्यासाठी ग्रामस्थांकडून सामूहिक जबाबदारीची हमी घेण्यात आली.जलसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी गावातून प्रभातफेरी काढून घोषवाक्या द्वारे जनजागृती केली. पाण्याच्या टाकीला जलबंधन बांधून जलसंपत्तीबद्दल आदर व सामूहिक जबाबदारीची भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी परिसर रांगोळी व फुलांनी सजवून उत्सवी वातावरण निर्माण करण्यात आले. कार्यक्रमस्थळी उपस्थित ग्रामस्थांनी जलप्रतिज्ञा घेत पाण्याची बचत व योग्य वापर करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी एफ.टी.के. द्वारे पाणी शुद्धीकरणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व पाण्याची गुणवत्ता तपासण्याची पद्धत समजावून सांगण्यात आली.

मांजरी म्हासला येथे शालेय विद्यार्थ्यांनी एकपात्री प्रयोग, लघुनाट्य, लोकगीत व गीतगायनाच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडत उपस्थितांची मने जिंकली. तर वडगाव माहोरे येथे जल पूजनाच्या माध्यमातून अनोखा संदेश दिला गेला कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत दोन्ही ग्रामपंचायतीकडे योजना हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून ग्रामस्थांना अधिकृत हस्तांतरण दस्तऐवज, समंजस करार व आराखडे सुपूर्द करण्यात आले.कार्यक्रमास दोन्ही गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सह.गट विकास अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व कनिष्ठ अभियंता, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामस्थ व इतर सर्वं विभागाचे कर्मचारी आणी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते. जल अर्पण दिवसाच्या निमित्ताने जलसंवर्धन, शाश्वत पाणी व्यवस्थापन व सामूहिक जबाबदारीचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याचे चित्र या उपक्रमातून दिसून आले.

