मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत राबविणार उपक्रम
ग्रामपंचायत व श्रीरामचंद्र संस्थान चा पुढाकार
नांदगाव पेठ/प्रतिनिधी
ग्रामपंचायत नांदगाव पेठ व श्रीरामचंद्र संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान” अंतर्गत रविवारी दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता ग्रामस्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील स्वच्छता राखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.ग्रामपंचायतच्या वतीने दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ग्रामस्वच्छता अभियान घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या माध्यमातून “माझे गाव, स्वच्छ गाव” ही संकल्पना वास्तवात आणण्याचा प्रयत्न आहे. अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत प्रांगणातून करण्यात येणार असून, यावेळी गावातील नागरिक, महिला बचतगट सदस्य, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.श्रीरामचंद्र संस्थानच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणाऱ्या या अभियानादरम्यान रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, शाळा परिसर आदींची स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना प्लास्टिकविरहित गाव निर्माण करण्याचा संदेशही देण्यात येणार आहे.“प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हे अभियान राबविण्यात येणार असून या रविवारी सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच कविता डांगे व ग्रामपंचायत अधिकारी हर्षदा बोंडे यांनीकेले आहे
