नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तथागत बहुउद्देशीय शिक्षण संस्था, अमरावती व डाॅ. आंबेडकर फाउंडेशन बहुउद्देशीय शिक्षण संस्था, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने १४ एप्रिल रोजी नांदगाव खंडेश्वर येथे विविध सामाजिक उपक्रमांचे व्यापक आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी सुप्रसिद्ध प्रशिक्षक नितेश कराळे यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच कार्यक्रमास तहसीलदार अश्विनी जाधव, माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप व समाजसेवक सुधाकर तायडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष व निमंत्रक किरण रहाटे असून, जयंती निमित्त समाजाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे उद्दिष्ट आयोजक संस्थांनी व्यक्त केले आहे.उपक्रमांतर्गत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सांस्कृतिक सादरीकरण, बक्षीस वितरण, एकपात्री नाट्यप्रयोग, तसेच विचारप्रवर्तक व्याख्यान यांचा समावेश आहे. डाॅ. आंबेडकरांनी मांडलेल्या मानवतावादी मूल्यांची जपणूक व समाजातील वंचित घटकांपर्यंत सहकार्याची भावना पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे संस्थांनी स्पष्ट केले. जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमांमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना बहुआयामी प्रबोधनाचा लाभ होणार आहे.
