
पालकमंत्री ना.बावनकुळे यांनी दिले पत्र
ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देण्याची मागणी
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्वात मोठे व व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गाव असलेल्या वाढोणा रामनाथ येथे पोलीस स्टेशन मंजूर करण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे.मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनपासून तब्बल 18 किमी अंतरावर असलेल्या या गावात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस उपस्थितीचा अभाव सतत जाणवतो.रात्रीच्या वेळी कोणतीही आपत्कालीन घटना घडल्यास मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनपर्यंत जाण्यासाठी वाहन उपलब्ध होत नाहीत ज्यामुळे पोलिसी हस्तक्षेपास विलंब होतो आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.
वाढोणा रामनाथ हे गाव अकोला, यवतमाळ व अमरावती आणि वासिम या चार जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे.त्यामुळे येथे गुन्हा घडल्यानंतर आरोपी इतर जिल्ह्यांत पसार होण्याची शक्यता वाढते.यामुळे गुन्हेगारांवर वेळीच कार्यवाही करणे अशक्य ठरत आहे.याच पार्श्वभूमीवर येथे स्वतंत्र पोलीस स्टेशनची नितांत गरज असल्याची मागणी ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या १० ते १५ गावातील नागरिकांनी केली आहे.गेल्या काही वर्षांपासून या मागणीसाठी अनेक वेळा शासन दरबारी निवेदने देण्यात आलीत मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ना चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश पत्राद्वारे जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक याना दिलेले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून शासनाकडून या महत्वपूर्ण मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे.आता या महत्वपूर्ण मागणीच्या पूर्ततेकरिता आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, आमच्या सुरक्षेचा प्रश्न सरकार गभीरपणे घेत नाही. जर लवकरच पोलीस स्टेशन मंजूर झाले नाही तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही.यासंदर्भात जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी स्वतः जातीने लक्ष घालून शासन दरबारी पाठपुरावा करावा,अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. हे प्रकरण केवळ वाढोणाच्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे मत स्थानिक व्यापारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.सध्या वाढोणा रामनाथ हे केवळ एक व्यापारी केंद्र नसून अनेक शैक्षणिक,सामाजिक आणि औद्योगिक उपक्रमांचे केंद्र बनले आहे.त्यामुळे येथे पोलीस ठाणे उभारणे ही काळाची गरज असून शासनाने या मागणीवर त्वरित निर्णय घ्यावा,अशी एकमुखी मागणी करण्यात आलेली आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सदैव कटिबद्ध आहेत. संबंधित परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आम्ही तातडीने राबवणार आहोत.जोपर्यंत त्या भागात पोलीस स्टेशन स्थापन होत नाही,तोपर्यंत पेट्रोलिंग वाढविण्यावर आमचा विशेष भर राहील. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलू. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील आवश्यक कार्यवाही लवकरच करण्यात येईल. पोलीस स्टेशन मंजूर करणे हा महाराष्ट्र शासनाचा अधिकार असून, त्यासंदर्भात आम्ही प्रस्ताव तयार करून लवकरच संबंधित यंत्रणेकडे पाठविणार आहोत आणि त्यांच्या मंजुरी करीता आम्ही पाठपुरावा करू.
*विशाल आनंद, ग्रामीण पोलीस अधिक्षक,अमरावती.*