पोलीस विभागाचे दुर्लक्ष असल्याने अंमली पदार्थांची सर्रास विक्री..शस्त्रे बाळगून शहरात पसरविली जात आहे दहशत
सुरक्षेच्या दृष्टीने धडक कारवाई ,पोलीस पेट्रोलिंग वाढविण्यासह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी
मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष देऊन शहर पोलिसांना ठोस कारवाईचे निर्देश देण्याची आ. सौ. सुलभाताई खोडके यांची सुचना
मुंबई / प्रतिनिधी
अमरावती शहरात एमडी ड्रग्स सारख्या अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असून वाढत्या अवैध धंद्यांच्या आड आखून गुन्हेगारी प्रवृत्तीना खतपाणी घातलं जात आहे. म्हणूनच शहरात अपराधिक घटनांना उधाण आले असून शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. हे असेच सुरु राहिले तर शहरात माफियाराज आल्या शिवाय राहणार नाही. यावर लगाम खेचण्यासाठी व अंकुश मिळविण्याची गृह विभागाने जातीने लक्ष घालून अमरावती शहर पोलिसांना कारवाई बाबतचे निर्देश देण्याची सूचना आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी पावसाळी अधिवेशनातुन केली आहे. शहरात अवैध धंद्याना अभय मिळत असल्याने आता गुन्हेगारांना खाकीचा धाक देखील राहिला नसून अमरावतीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याची सुद्धा हत्या करण्यात आली असल्याची बाब आमदार महोदयांनी सभागृहाला अवगत करून दिली.

राज्यविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये गृह विभागाशी संबंधित पुरवणी मागणींवर चर्चा करतांना आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी अमरावती शहरातील वाढता गुन्हेगारीचा ग्राफच सभागृहासमक्ष मांडला. अमरावती शहर हे एक शांततेचे शहर असतांना आज शहरात एमडी ड्रग्स , गांज्या, गुटखा सारखे अंमली पदार्थाच्या तस्करीमुळे गुन्हेगारी वाढली आहे.यात अल्पवयीन मुलांचा वापर होत असून त्यांच्या मार्फत शाळा, महाविद्यालय व घरोघरी अंमली पदार्थ पोहोचविल्या जात आहे. गुटख्याची सर्रास विक्री , अवैध दारू विक्री होत असून याबाबत पोलिसांच्या तर्फे थातुरमातुर कार्यवाही सुद्धा करण्यात आली. मात्र पुन्हा हे सराईत गुन्हेगार जामिनावर बाहेर येऊन अपराधिक कृत्य करत आहे. शहरात कुठे अंमली पदार्थांची तस्करी होते ते पोलीस विभाग किंवा त्यांचे खुफिया व बिट जमादार यांना माहित नसेल का ? मात्र तरीदेखील याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. यावर कारवाई करतांना केवळ म्होरके पकडण्यात येतात परंतु मोठे मासे जाळ्यात अडकण्याची गरज आहे. त्यामुळे अमरावती शहरात एमडी ड्रग्स व अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष देऊन अमरावती शहर पोलिसांना कारवाई बाबत उचित आदेश निर्गमित करणार का ? असा प्रश्न आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी विधानसभेत बोलतांना उपस्थित केला. शहरात स्पा मसाज सेंटर चालविले जात असून त्या आड अनुचित प्रकार सुद्धा सुरु आहे. पोलिसांनी धाड टाकून कार्यवाही केली. मात्र अशा प्रकारचे स्पा सेंटर चालविण्यासाठी परवानगी मिळणे हि एक चिंतेची बाब आहे. यातून सर्वसामान्य व बेरोजगार युवक -युवती गुन्हेगारीच्या खाईत लोटले जात असल्याचे सांगून आमदार महोदयांनी यावर थेट बंदी घालण्याची मागणी केली. शहरात गल्लोगल्ली चक्री जुगार, सट्टा व क्रिकेट बेटिंग सारखे प्रकार वाढले असून झटपट पैसे कमविण्याच्या नादात आजही पिढी गुन्हेगारीकडे वळत आहे. वाढत्या चोरीच्या घटना सुद्धा चिंतेची बाब असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरात चोख बंदोबस्त व नियमित पेट्रोलिंग वाढविण्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना सुद्धा आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी सभागृहात मांडल्या. मागील पाच वर्षापासून आपण गृह विभागाकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे अमरावती शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात कार्यवाही करावी, शहराचा विस्तार होत असल्याने वाहतूक सुद्धा वाढली आहे. वाहतूक नियंत्रित करण्यासाठी उत्तमरित्या ट्रॅफिकची व्यवस्था करण्यात यावी, सर्व सर्व बाबींकडे अमरावती शहर पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन उपायोजना करण्याची गरज असल्याचे आमदार महोदयांनी शासनाच्या गृह विभागाचे लक्ष वेधले.अमरावती शहरात गेल्या आठवड्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक -अब्दुल कलाम अब्दुल कदीर यांची हत्या करण्यात आली. पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आल्या सारखी घटना घडत असल्याने आता कायद्याचा धाक राहिला नाही का? म्ह्णून यामध्ये वाढती गुन्हेगारी व अपराधिक प्रवृत्ती हेच महत्वाचे कारण असल्याने गृह विभागाने अमरावती शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रभावी उपाययोजना व ठोस कार्यवाही करण्यासंदर्भात पाऊले उचलावीत , अशी मागणी आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी पावसाळी अधिवेशनातुन केली आहे.
