
युनिव्र्हसिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्कबाबत डॉ. स्मिता आचार्य यांचे विद्यापीठात उद्बोधन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या 7 मार्च च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागांना युनिव्र्हसिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्कमध्ये सहभागी व्हायचे असून, दरवर्षी 30 जून पर्यंत विभागाची उपलब्धी क्रेडेनशीयल आणि कामगिरीची माहिती सादर करणे बंधनकारक असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आय.क्यू.ए.सी. संचालक डॉ. स्मिता आचार्य यांनी दिली. आयोजित कार्यक्रमप्रसंगी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, ननसा संचालक डॉ. अजय लाड उपस्थित होते.युनिव्र्हसिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्कबाबत माहिती देतांना डॉ. आचार्य म्हणाल्या, महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ‘युनिव्र्हसिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क’ लागू केला असून, त्याचा शासन निर्णय प्रसिध्द केला आहे. या निर्णयानुसार, विद्यापीठांमधील शैक्षणिक विभागांना वर्षभरातील क्रेडेन्शियल्स, उपलब्धी आणि कामगिरीची माहिती सादर करणे बंधनकारक असणार आहे. यामध्ये संशोधन पेपर्स, पेटंट्स, मंजुरी पत्रे, निधी वितरणाची पत्रे, उपयोगिता प्रमाणपत्रे आणि शैक्षणिक ऑडिट अहवालासह सादर करावे लागणार आहे. बाह्य तज्ज्ञ समितीद्वारे या माहितीची छाननी होईल. या फ्रेमवर्कमध्ये विविध श्रेणींनुसार शैक्षणिक विभागांचे मूल्यांकन होणार आहे.
मूल्यांकनाचे प्रमुख निकष
पीएच.डी. शिक्षकांची संख्या, पूर्णवेळ शिक्षकांची संख्या, शिक्षकांना मिळालेले राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार, आंतरराष्ट्रीय फेलोशिप, विभागातील पीएच.डी. मिळालेल्या विद्याथ्र्यांची संख्या यासाठी गुण ठेवण्यात आले आहे. संशोधन प्रकल्पासाठी मिळालेले अनुदान, सल्लागार सेवा आणि कार्पोरेट प्रशिक्षणामधून मिळणारे उत्पन्न, सरकारी एजन्सीकडून मान्यता आणि पायाभूत सुविधांसाठी मिळालेला निधी, स्टार्ट-अप, इनक्यूबेशन, नोंदणीकृत स्टार्ट-अप्स, बौध्दीक संपदा अधिकार, प्रदान केलेले पेटंट्स आणि तंत्रज्ञान हस्तांतरण, वेब ऑफ सायन्समध्ये प्रकाशित झालेले संशोधन पेपर्स, शिक्षक संचयी प्रभाव, विभागाच्या संचयी एच-इंडेक्स, नॉन-स्कोप्स/वेब ऑफ सायन्सेस जर्नल्समधील प्रकाशन आणि इतर उपक्रम, प्रकाशित केलेली पुस्तके इत्यादी बाबी असणार आहेत. या नवीन फ्रेमवर्कमुळे विद्यापीठांच्या विभागांमध्ये गुणवत्ता आणि संशोधनाला चालना मिळेल, असेही त्या म्हणाल्या.सुरुवातीला ननसा संचालक डॉ. अजय लाड यांनी पुष्पगुच्छ देवून कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते व डॉ. स्मिता आचार्य यांचे स्वागत केले. शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून डॉ. आचार्य यांचा कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी विद्यापीठाचेवतीने सत्कार केला. संचालन व अतिथींचा परिचय विकास विभागाच्या उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील यांनी, तर आभार जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी मानले. उपस्थित शैक्षणिक विभागप्रमुख व शिक्षकांनी प्रश्न विचारुन आपल्या अडचणी समजून घेतल्या. यावेळी विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.