नांदगाव खंडेश्वर येथे नाल्यालगत प्रतीकात्मक निषेध; “नरेंद्र सिलेंडर”च्या घोषणा
महागाई, गॅस तुटवडा व शेतमाल निर्यात धोरणावर केंद्र सरकारवर टीका
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
घरगुती गॅसच्या किमती गगनाला भिडल्या असून दुसरीकडे गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने गृहिणींसह संपूर्ण कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. गॅस संपल्यामुळे नागरिकांना कामधंदा सोडून गॅससाठी लाईनमध्ये उभे राहावे लागत असून त्यामुळे रोजगारावरही परिणाम होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेस व काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार रोजी नांदगाव खंडेश्वर येथे नाल्यालगत अनोखे प्रतीकात्मक आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी “नरेंद्र सिलेंडर” अशा घोषणा देत केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला.

देशाच्या संरक्षणापासून ते नागरिकांच्या मूलभूत गरजांपर्यंत केंद्र सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सीमावरील सुरक्षेपासून ते देशांतर्गत महागाईपर्यंत सर्वच बाबतीत सरकारने शरणागती पत्करल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. तसेच अमेरिकेसमोर शरणागती पत्करल्यामुळे तेथील मालावर भारतात शुल्कमाफी मिळत असून भारतातील शेतमाल अमेरिकेत निर्यात करताना 30 टक्के टॅरिफ लावण्यात येत असल्याने शेतमालाचे भाव घसरल्याचेही यावेळी सांगण्यात आले.पंतप्रधानांनी गटारातून गॅस गोळा करून त्यावर चहा बनवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत युवक काँग्रेसने नाल्यालगत आंदोलन केले.या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित दादा जगताप, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिपक भगत, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अमोल धवसे यांनी केले. यावेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मंगेश जोगे, मो. रियाज सय्यद मोफिक, अतुल ठाकूर, रमेश ठाकरे, राजेंद्रभाऊ पारधी (सरपंच म.च.), पवन कारेकर, सुशील थोरात, समीर दहातोंडे, प्रमोद भाऊ इंझडकर, प्रदीप ब्राम्हणवाडे, रणजीत मेश्राम, पंकज वानखडे, सुरज सोनोने, तन्वीर , पंकज दादा जगणे तसेच इतर काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
