नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते ११.०० या वेळेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभा येथे पीएमश्री योजनेअंतर्गत “आकाश निरीक्षण” हा अत्यंत ज्ञानवर्धक व प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला.या उपक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनीही सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दुर्बिणीद्वारे (टेलिस्कोप) आकाश निरीक्षण करण्याची दुर्मीळ संधी मिळाली. खगोल अभ्यासक विजय गिरुळकर व प्रवीण गुल्हाने यांनी विद्यार्थ्यांना गुरु ग्रह व चंद्राचे प्रत्यक्ष दर्शन घडवून त्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी प्रथमच इतक्या जवळून ग्रहांचे निरीक्षण करताना मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.या विशेष उपक्रमासाठी केंद्रप्रमुख भूषण बागडे यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इमरान मिर्झा यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून उपक्रमाची शोभा वाढवली. तसेच या कार्यक्रमासाठी विजय देशमुख यांनी मोलाचे सहकार्य केले.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अरुणा घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षकवृंदांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणारा व त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारविणारा ठरला असून शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये एक उल्लेखनीय पाऊल म्हणून त्याची नोंद झाली आहे.
