फिर्यादीकडून अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी
अचलपूर/ फिरोज खान
अचलपूर तालुक्यातील वाघडोह ग्रामपंचायतीत सरपंच/ उपसरपंच व त्यांच्या पतीवर दडपशाही, धमक्या आणि अनियमित कारभाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भात ग्रामपंचायतीचे रहिवासी रमेश सुराजू गाठे यांनी पंचायत समिती अचलपूर, जिल्हा परिषद अमरावती, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती आणि जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.फिर्यादी रमेश गाठे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ग्रामपंचायतीच्या सरपंच/ उपसरपंच पती १) संतोष शामराव लंगोटे व २)आनंद शिवचरण गाठे हे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात बेकायदेशीर हस्तक्षेप करीत आहेत. त्यांनी तक्रारदाराला धमकावत म्हणाले की, “जर तू ग्रामपंचायतीच्या कामात ये-जा केलीस किंवा मला रोखण्याचा प्रयत्न केलास, तर तुझ्यासाठी चांगले होणार नाही.”तक्रारदार रमेश गाठे यांनी पुढे म्हटले आहे की, सरपंच/ उपसरपंच स्वतःच्या पतींमार्फत पंचायत कामकाजातील सर्व निर्णयांमध्ये अनुचित हस्तक्षेप करतात. त्यांनी आपल्या निवेदनात लिहिले आहे की – “ग्रामपंचायतीत काम पाहण्यासाठी गेल्यास आम्हाला अपशब्द बोलले जातात, धमकावले जाते,

आणि दबाव आणला जातो. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की ‘ग्रामपंचायतीत मीच ठरवीन काय होणार, मिच सरपंच आहे तू थांबलास तर परिणाम वाईट होतील.’”या घटनेमुळे ग्रामपंचायतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सामान्य नागरिकांमध्ये असंतोष आहे. रमेश गाठे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की सरपंच/ उपसरपंच पतीच्या हस्तक्षेपाची चौकशी करण्यात यावी आणि सरपंच / उपसरपंच पतीस ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेशबंदी लागू करण्यात यावी.ही लेखी तक्रार ७ ऑक्टोबर २०२५ रोजी वाघडोह ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती अचलपूर, जिल्हा परिषद अमरावती, आणि जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे सादर करण्यात आली असून, त्यासोबत डाक पावतीची प्रतही जोडण्यात आली आहे.फिर्यादी रमेश गाठे यांनी म्हटले की, “ग्रामपंचायतीत सामान्य नागरिकांवर दडपण आणून काम केले जाते. सरपंच/ उपसरपंच पतींच्या धमक्या, गलिच्छ भाषेचा वापर आणि दबावामुळे ग्रामविकासाची कामे ठप्प झाली आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून निष्पक्ष चौकशी करावी.”या प्रकरणामुळे वाघडोह ग्रामपंचायतीत राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये देखील संतापाची लाट असून त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की — जर आरोप सत्य ठरले, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून ग्रामपंचायतीचे कामकाज पारदर्शक आणि भीतीविरहित वातावरणात सुरू राहील.नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे न्याय मिळविण्यासाठी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
