
विद्यार्थ्यांनी न घाबरता नवीन शैक्षणिक धोरण समजून घ्यावे.
उपप्राचार्य डॉ. नंदकिशोर गव्हाळे यांचे प्रतिपादन
चांदूर बाजार/एजाज खान
चांदूरबाजार येथील गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बीए, बीकॉम. बीएस्सी प्रथम वर्षात नवप्रवेशित विद्यार्थ्याकरिता महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात इंडक्शन प्रोग्राम (दीक्षारंभ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, उद्घाटक म्हणून डॉ. नंदकिशोर गव्हाळे, आयक्यूएसी समन्वयक डॉ. सुमित इंगळे, मराठी विभाग प्रमुख डॉ. रवींद्र डाखोरे, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोविंदरावदादा टोम्पे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. लालबा दुमटकर यांनी दीक्षारंभ कार्यक्रमाची भूमिका सविस्तर मांडली तर उद्घाटक डॉ. नंदकिशोर गव्हाळे कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, दीक्षारंभ कार्यक्रम हा महाविद्यालयातील नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व नवप्रवेशित विद्यार्थ्यांना महाविद्यालयासंबंधीची व महाविद्यालयात चालवण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाविषयी इत्यंभूत माहिती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सामाजिक, सांस्कृतिक, शारीरिक आणि बौद्धिक विकास झाला पाहिजे याकरिता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगून राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे मागील वर्षीपासून लागू करण्यात आलेले आहे. या एज्युकेशन पॉलिसीमध्ये विद्यार्थ्यांना पारंपरिक विषयाबरोबरच काही कौशल्य विकासावर आधारित विषयसुद्धा शिकवण्यात येणार आहेत. तसेच इतर विद्याशाखेमधून जिओईसी नावाचा विषय प्रत्येक विद्यार्थ्याला निवडायचा आहे असे म्हणून या राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणाला विद्यार्थ्यांनी न घाबरता सामोरे जावे आणि आपले उज्वल भविष्य घडवावे असे म्हणाले तर आयक्यूएसी कॉर्डिनेटर डॉ. सुमित इंगळे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात इंटरनल क्वालिटी ॲशुरन्स सेल कशा पद्धतीने काम करते आणि महाविद्यालयाला चांगले गुणांकन मिळवून देते यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.दुसऱ्या सत्रात महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व महाविद्यालयीन विविध समित्यांचे समन्वयक या सर्वांनी आपापल्या विभागाबरोबरच समितीच्या कामकाजाबद्दलही विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती करून दिले तसेच ग्रंथपाल डॉ. पार्वती शिर्के, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. अजित भिसे यांनी विद्यार्थ्यांना अनुक्रमे ग्रंथालय व क्रीडा विषयक माहिती दिली. शिष्यवृत्ती आणि कार्यालयीन कामकाजाबाबत वरिष्ठ लिपिक श्री नितीन तसरे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी नवप्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीक्षारंभ कार्यक्रमाचे सहसमन्वयक डॉ. प्रिया देवळे यांनी केले तर आभार प्रा. प्रशांत यावले यांनी मानले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.