
गुरू पौर्णिमा मातृ पितृ पूजन सोहळा
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
स्थानिक विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित टायटन्स पब्लिक स्कूल किंडर गार्टन वाटीका हाॅलीवूड काॅलनी अमरावती येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.संपूर्ण भारतात गुरूपौर्णिमेला विशेष असे महत्व आहे. गुरूपौर्णिमेला ‘आषाढ पौर्णिमा’ आणि ‘व्यास पौर्णिमा’ म्हणून ही ओळखले जाते. हिंदू धर्मामध्ये गुरूला देवासमान दर्जा देण्यात आला आहे.या शुभ दिनी गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो आणि गुरूंची मनोभावे पूजा केली जाते. गुरूपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांना समर्पित करण्यात आली आहे. कारण, याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता.
त्यामुळे, हा दिवस गुरूच्या प्रती सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. विद्याथ्यांचे पहिले गुरू आई आणि वडील, त्यामुळे टायटन्स स्कूल ने मातृ पितृ पूजनाचा कार्यक्रम गुरू पौर्णिमा निमित्त टोंगसे पाटील बिल्डकाॅन करीअर गाईडन्स अकॅडमी मध्ये आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण टोंगसे पाटील होते तसेच श्री योग वेदांत सेवा समिती बालसंस्कार विभाग तर्फे अर्चना ठाकरे, राधा चौधरी,सरीता पल्हाडे, संगिता राठोड उपस्थित होते.सर्व प्रथम पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.उपस्थित पालकांचे पूजन त्यांच्या पाल्यांचे हस्ते राधा चौधरी यांनी करवून घेतले.आईवडील आणि गुरूजनांचा सन्मान,आदर करण्याचे संस्कार विद्यार्थ्यांवर करणे हा या मागचा उद्देश होता.कार्यक्रमाचे आयोजन स्मिता ठाकरे यांनी केले होते तर संचालन स्नेहवर्धिनी देशमुख यांनी केले.प्रिया पाटील यांनी आभारप्रदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकृष्ण टोंगसे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पालकांसोबत संवाद साधत बालसंस्कारांचे महत्त्व आणि आवश्यकता का आहे हे समजावून सांगितले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टायटन्स पब्लिक स्कूल च्या सर्व कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेतले.