सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप.
वाहने उभी करण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे दिल्याचा होतोय आरोप;
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून येथील शासकीय विश्रामगृह परिसर आता खाजगी वाहनांच्या वाहनतळात रूपांतरित झाल्याची गंभीर चर्चा सुरू आहे. सरकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली असलेल्या या ठिकाणी शेकडो दोनचाकी आणि चारचाकी वाहने कायमस्वरूपी उभी दिसत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की शहरातील अनेक लोक आपली वाहने घरी न उभी करता थेट विश्रामगृह परिसरात आणून उभी करतात. त्यामुळे या परिसरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून संपूर्ण परिसर खाजगी पार्किंगसारखा दिसू लागला आहे. शासकीय विश्रामगृह असतानाही त्याचा वापर अशा प्रकारे होत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याबाबत काही वाहनमालकांना विचारणा केली असता त्यांनी धक्कादायक दावा केला. “आम्ही येथे वाहने उभी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना पैसे देतो, त्यामुळे कोणीही अडवत नाही,” असे त्यांनी सांगितले. वाहन मालकांच्या या दाव्यामुळे प्रकरण आणखी गंभीर झाले असून भ्रष्टाचाराचा वास येत असल्याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे.दरम्यान, या सर्व प्रकारामागे सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांचे मौन किंवा आशिर्वाद असल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे. जर हे खरे असेल तर शासकीय संपत्तीचा खाजगी फायद्यासाठी वापर होत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे की विश्रामगृह हे प्रवासी व शासकीय कामासाठी येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी असते, मात्र येथे उलट परिस्थिती दिसत आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन परिसरातील बेकायदेशीर पार्किंग थांबवावे, अन्यथा नागरिकानी आंदोलनाचा इशारा दिला आहे.आता या प्रकरणावर सार्वजनिक बांधकाम विभाग येथील संबंधित अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार आहे याकडे संपूर्ण नांदगाव खंडेश्वर शहराचे लक्ष लागले आहे.
