अंबादेवी संस्थानमध्ये पालखी सोहळा,काल्याचे किर्तन व महाप्रसाद
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
चोर माऊली येथील श्री. क्षेत्र अंबादेवी संस्थानमध्ये श्री. संत गजानन महाराजांचा प्रकट दिन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सलग पाच दिवस श्री. संत गजानन महाराज ग्रंथाचे पारायण करण्यात आले. प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी सर्वप्रथम गावातून श्रींच्या पालखीचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले.यानंतर हरिभक्त परायण त्रंबकराव बाभूळकर महाराज यांच्या वाणीतून काल्याचे किर्तन आयोजित करण्यात आले. किर्तनानंतर लगेचच महाप्रसादास सुरुवात करण्यात आली. या महाप्रसादाचा बहुसंख्य ग्रामस्थ व भाविक भक्तांनी लाभ घेतला.या यशस्वी कार्यक्रमासाठी संस्थेच्या वतीने सर्व दानदाते, देणगीदार, ग्रामस्थ व भाविक भक्तांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी श्रमदानातून सहकार्य करणाऱ्या सर्वांचेही संस्थेमार्फत आभार मानण्यात आले.
