नागपूर/ जिल्हा प्रतिनिधी
अनैतिक संबंध, विश्वासघात आणि सततच्या धमक्यांचा अखेर रक्तरंजित शेवट झाला. प्रेयसी असलेल्या विवाहित महिलेने आपल्या पतीच्या मदतीने प्रियकर असलेल्या मामेभावाची धारदार सतुराने भररस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना कोराडी परिसरात उघडकीस आली आहे. गुरुवार, ५ मार्च रोजी सकाळी सुमारे ११ वाजता ही घटना घडली. खून केल्यानंतर आरोपी पतिपत्नीने थेट खापरखेडा पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.सागर वानखेडे (वय ५०, रा. येरला, ता. नरखेड) असे मृत व्यक्तीचे नाव असून सोनाली उर्फ सोनू गजभिये व तिचा पती राजेश गजभिये (रा. वॉर्ड क्र. १, रेल्वे चौकी, खापरखेडा) अशी आरोपींची नावे आहेत.
इन्स्टाग्रामवरून सुरू झाले प्रेमसंबंध
सोनाली आणि राजेश यांचे लग्न २०११ मध्ये झाले होते. त्यांना ११ वर्षांचा मुलगा आणि एक लहान मुलगी आहे. चार वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सोनालीचा तिच्या मामेभावा सागर वानखेडेशी संपर्क आला आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. काही दिवसांतच हे संबंध इतके वाढले की सोनाली घरातील सोन्याचांदीचे दागिने घेऊन सागरसोबत पुण्याला पळून गेली.पुण्यात गेल्यानंतर सागरने तिचे दागिने विकल्याचे समोर आले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या प्रकरणी सोनालीने पुणे पोलिसांत तक्रारही दिली होती. काही दिवसांनी आपली चूक उमगल्याने सोनालीने पती व दोन मुलांसोबत पुन्हा संसार करण्याचा निर्णय घेतला आणि ती खापरखेडा येथे परतली.
धमक्यांमुळे वाढला तणाव
सोनाली परत आल्यानंतरही सागर तिचा पाठलाग सोडायला तयार नव्हता. तो वारंवार फोन करून सोनालीला पती व मुलांचा खून करण्याच्या धमक्या देत होता. या धमक्यांमुळे सोनाली मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती.
पर्स पडल्याचा बहाणा… आणि हल्ला
गुरुवारी, ५ मार्च रोजी सागर आपल्या एमएच ४०/ डीएफ ८१७५ क्रमांकाच्या दुचाकीने खापरखेडा येथे आला. त्याने सोनालीला फोन करून वॉर्ड क्रमांक २ मधील श्याम सभागृह परिसरात बोलावून घेतले. त्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि पुन्हा एकदा पती व मुलांना मारण्याची धमकी देत होता.सोनालीने संतापाच्या भरात घरातून सत्तूर घेतला आणि सागरच्या दुचाकीवर बसली. दोघे अण्णामोड चौकातून खापरखेडा–कोराडी मार्गाने निघाले. कोलार पुलाजवळ पोहोचल्यावर सोनालीने ‘पर्स पडली’ असा बहाणा करून सागरला गाडी थांबवायला सांगितले. दुचाकी थांबताच सोनालीने सत्तुराने सागरवर सपासप वार केले.त्याचवेळी तिथे सोनालीचा पती राजेशही दुचाकीने पोहोचला. त्याने सागरचे केस पकडून त्याच्यावर आणखी वार केले. काही क्षणांतच सागर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
रक्ताचे डाग धुतल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात!
खून केल्यानंतर दोघांचे कपडे रक्ताने माखले होते. त्यामुळे आरोपी पतिपत्नी आधी घरी गेले. त्यांनी रक्त लागलेले कपडे धुतले आणि त्यानंतर थेट खापरखेडा पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. मात्र घटनास्थळ कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने कोराडी पोलिसांना कळविण्यात आले. कोराडी पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल, सिगारेटचे पाकीट आणि कंडोम जप्त केले असून खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी सोनाली व तिचा पती राजेश गजभिये यांना ताब्यात घेतले आहे.
