
उपअभियंता यांच्यावर कार्यवाही करण्याची हिवरा बु ग्रामपंचायतीची मागणी
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवरा बु ग्रामपंचायतीने अमरावती येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक २ यांच्याकडे शाळा दुरुस्ती कामासाठी दिनांक १० मार्च २०२५ रोजी प्रस्ताव सादर केला होता.या प्रस्तावात आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती शासनाच्या दिनांक २० सप्टेंबर २०२४ च्या आदेशानुसार शाळा दुरुस्तीच्या कामासाठी ग्रामपंचायतीकडून मागणी आली असल्यास हे काम ग्रामपंचायतीलाच देणे बंधनकारक आहे.ग्रामपंचायतीचे बळकटीकरण व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने वेळोवेळी स्पष्ट आदेश दिलेले असतानाही बांधकाम विभागातील उपअभियंता यांनी शासन निर्णयाचा अवमान करत परस्पर हितसंबंध असलेल्या खासगी कंत्राटदाराला काम देत निविदा प्रक्रियेत गंभीर प्रकारची अफरातफर केल्याचा आरोप ग्रामपंचायतीकडून करण्यात आला आहे.ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मिनाताई प्रकाश सोळंके यांनी दिलेल्या निवेदनात या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित उपअभियंता यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी स्पष्ट मागणी केली आहे.या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधूनही होत आहे.